खून प्रकरणी पोलिसांच्या ताब्यातील संशयित आरोपीने मिरजेच्या कोठडीत गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न रविवारी पहाटे  केला. उपचारासाठी त्याला सांगलीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबद्दल संशयिताच्या नातेवाईकांनी कोणतीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले असले तरी उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत आहे.
    मिरजेच्या म्हैसाळ वेस भागातील म्हाडा कॉलनीत राहणाऱ्या अरुण निळकंठ खाडे या संशयिताला  २३ जून रोजी पोलिसांनी खून प्रकरणी अटक केली होती. त्याने समीर गाडद याचा समलंगिक संबंधातून रविवारी, २२ जून रोजी रात्री ढवळी रस्त्यावर प्लॅस्टिकच्या दोरीने गळा आवळून खून केला होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने अधिक तपासासाठी २४ जून रोजी पाच दिवस पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या आदेशान्वये तो मिरज शहर पोलिसांच्या कस्टडीत होता.
    शनिवारी रात्री त्याच्यासोबत अन्य गुन्ह्यातील अमोल बनसोडे, अमित शिकलगार व विशाल रजपूत हे संशयित कोठडीत होते. चौघांची रात्री बोलाचालीही झाली. सर्वजण झोपल्यानंतर पहाटे साडेपाच वाजता पांघरण्यासाठी दिलेल्या बेडशीटची पट्टी काढून त्याने लोखंडी ग्रीलला गळफास बांधून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्या आरडय़ाओरडय़ाने गस्तीवर असणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी विशाखा माळी हिने धावपळ करून आतील संशयितांच्या मदतीने त्याला वाचविले. अत्यवस्थ स्थितीत उपचारासाठी त्याला सांगलीच्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे.
    हातून घडलेला खुनासारखा प्रकार आणि खुनाच्या कारणामागील कारणामुळे सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळाली व कुटुंबीयांतून मानहानीला सामोरे जावे लागले यामुळे जगणे असह्य झाले असल्याचे त्याने कोठडीतील सोबतींना सांगितले असल्याचा जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. या शिवाय आज सायंकाळी विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर संशयित आरोपीने शुद्धीवर आल्यानंतर जबाब दिला असून जगण्यात अर्थ नाही म्हणून आपण आत्महत्या करीत होतो असे त्याने सांगितले आहे.
    दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.  कोठडीतील संशयित आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न झाल्याने  ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली असून वरिष्ठ स्तरावरील चौकशी सुरू करण्यात आली आहे.