शनिवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले येथील माजी नगरसेवक शकील अहमद (५०) यांचा मृतहेह रविवारी सकाळी संशयास्पदरीत्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करत आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेत नातेवाईकांनी सामान्य रुग्णालयात आंदोलन केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी घरातून बाहेर पडलेले शकील हे रात्री उशिरापर्यंत परतले नाहीत. रविवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील नवीन गिरणा पुलाखाली त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. विच्छेदनासाठी हा मृतदेह सामान्य रुग्णालयात नेण्यात आल्यावर तेथे नातेवाईकांनी धाव घेतली. राजकीय वैमनस्यातून घातपात झाल्याचा आरोप करत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. संशयितांना आधी अटक करावी, असा त्यांनी आग्रह धरला. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने व अजित हगवणे यांनी समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी आंदोलन मागे घेत मृतदेह ताब्यात घेतला.

प्रथमदर्शनी शकील यांच्या छातीला मार लागल्याचे दिसून येत असले तरी शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल आल्यानंतरच त्या संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाणार आहे. किल्ला पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. शकील हे २००१-२००६ या काळात पालिकेचे अपक्ष नगरसेवक होते. जमीन खरेदी-विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय होता.

 

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suspicious death of former councilor
First published on: 10-10-2016 at 00:57 IST