सावंतवाडी : कणकवलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा १५ ऑक्टोबरला होत आहे, त्या वेळी स्वाभिमान पक्षाचे भाजपात विलीनीकरण होईल, असे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी सांगितले तसेच दीपक केसरकर यांना जनता कंटाळली आहे त्यामुळे त्याचा पराभव करण्यासाठी भाजपचे पुरस्कृत उमेदवार राजन तेली याला पािठबा दिला आहे असे ते म्हणाले.
संथ मागील दहा वर्षे आमदार व पाच वर्षे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर हे युतीचे उमेदवार आहेत. मात्र त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी घोषणा केलेल्या कोणत्याही आश्वासनाची पूर्तता होऊ शकली नाही. रस्त्यांची दुर्दशा आहे, तर प्रकल्प ठप्प आहेत. एक निष्क्रिय आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यामुळेच असा निष्क्रिय आमदार पुन्हा निवडून येऊ नये यासाठीच विकासाची जाण असलेला व मागील निवडणुकीत दोन नंबरची मते असलेल्या राजन तेली यांना माझा व माझ्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा संपूर्ण पािठबा आहे. माझे कार्यकत्रे एकदिलाने काम करून तेलींना निवडून आणतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष व भाजप यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी पालकमंत्र्यांच्या निष्क्रिय कारभारावर ताशेरे ओढले. १५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणकवली येथे जाहीर सभा होत असून या सभेत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विलीन करणार असल्याची घोषणाही त्यांनी या वेळी केली. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी खा. नीलेश राणे, उमेदवार राजन तेली, स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष संजू परब, अतुल काळसेकर, सभापती पंकज पेडणेकर, मधुसूदन बांदिवडेकर, राजू राऊळ, पुखराज पुरोहित आदी उपस्थित होते.
काहीही करून केसरकर निवडून येता कामा नये या हेतूनेच आपण राजन तेली यांना पािठबा दिला आहे. आम्हाला विकास हवा आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांची दुर्दशा, वाढलेली बेरोजगारी, ठप्प झालेला विकास यांना न्याय देऊ न शकलेला पालकमंत्री परत निवडून येता कामा नये. त्यामुळे विकासाची जाण असलेला व विकास करू न शकणारा असा उमेदवार राजन तेलींच्या रूपाने उभा असून त्यांना आमच्या पक्षाचा संपूर्ण पािठबा राहील, असा पुनर्उच्चारही त्यांनी केला.
काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष गलितगात्र झाले असून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एकतर्फी होईल. भाजपला राज्यात यश मिळणार आहे. जिल्ह्य़ातही या निवडणुकीनंतर भाजपचे प्राबल्य वाढेल त्यामुळे भविष्यात युतीची गरज भासणार नाही. कणकवलीत सेनेने युतीचे पावित्र्य राखले नाही. त्यामुळेच भाजपनेदेखील अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत केले आहे. १५ तारखेनंतर भारतीय जनता पक्ष जिथे पाठवील तिथे मी प्रचाराला जाईन, असेही त्यांनी स्पष्ट केले.