राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. या घटनेमुळे फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला. राज्यात मोठ्या संख्येने तरुण या परीक्षेची तयारी करत असतात. त्यांच्यासाठी देखील हा धक्का ठरला. या तरुणाच्या आत्महत्येवर हळहळ व्यक्त होतानाच दुसरीकडे एमपीएससीच्या कारभारावर आणि निर्णय प्रक्रियेतील ढिलाईवरही तीव्र टीका होऊ लागली आहे. खुद्द सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहीत पवार यांनी देखील या मुद्दयावरून सरकारला विनंती केली आहे. “युवा पिढी निराश असून वकरात लवकर परीक्षा घ्याव्यात”, अशी विनंती रोहीत पवार यांनी ट्वीट करून केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तातडीने नियुक्त्या करा!

आपल्या ट्वीटमध्ये रोहीत पवार यांनी परीक्षा घेण्यासोबतच तातडीने त्यांना नियुक्त्या देखील देण्याची विनंती केली आहे. “करोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरीत घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात”, असं ट्वीट रोहीत पवार यांनी केलं आहे.

 

स्वप्नील लोणकरची सुसाईड नोट!

दरम्यान, स्वप्नील लोणकर यानं आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून मन हेलावून टाकणाऱ्या शब्दांत आपली कैफियत मांडली आहे. “MPSC मायाजाल आहे, यात पडू नका. येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जातं. आत्मविश्वास तळाला पोहोचतो आणि स्वत: बद्दल शंका वाढत जाते. २ वर्षे झाली आहेत उत्तीर्ण होऊन आणि २४ वय संपत आलंय. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! करोना नसता, सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. मी घाबरलो, खचलो असं मुळीच नाहीये, फक्त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता”, असं त्यानं आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

MPSCच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्याने तरुणाची आत्महत्या – वाचा सविस्तर

स्वप्नील पुढे म्हणतो…

“नकारात्मकतेची ही वादळं कित्येक दिवस ही मनात होती. पण काही तरी चांगल होईल, या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य सुरू राहू शकेल, असं काहीच उरलं नाहीये. यांस कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा! मला डोनेशन करून १०० जीव वाचवायचे होते, ७२ राहिले…. जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचावा, अनेक जीव वाचतील”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swapnil lonkar suicide pending mpsc interview process ncp mla rohit pawar tweets pmw
First published on: 04-07-2021 at 11:17 IST