scorecardresearch

रत्नागिरीत शुक्रवारपासून ‘स्वरभास्कर संगीत महोत्सव’

शुक्रवारपासून (११) सुरू होणारा हा महोत्सव पं. भीमसेन जोशी यांना जन्मशताब्दीनिमित्त अर्पण करण्यात आला आहे.

रत्नागिरी  :  किराणा घराण्याचे ख्यातनाम गायक पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आर्ट सर्कल, रत्नागिरीतर्फे ‘स्वरभास्कर संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

दर्जेदार शास्त्रीय गायन-वादन, नृत्याची मेजवानी असलेला संगीत महोत्सव आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे गेली १४ वर्षे जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवडय़ात येथील थिबा राजवाडय़ाच्या भव्य प्रांगणात दिमाखदार पद्धतीने आयोजित केला जातो. यंदा करोनाच्या उद्रेकामुळे तो होऊ शकला नाही; पण आता या महामारीचा जोर ओसरल्यामुळे येत्या शुक्रवारपासून (११) सुरू होणारा हा महोत्सव पं. भीमसेन जोशी यांना जन्मशताब्दीनिमित्त अर्पण करण्यात आला आहे.

संगीत क्षेत्रातील परवीन सुलताना, एन. राज्य, उस्ताद झाकीर हुसेन, रशीद खान इत्यादी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक कलाकारांनी या महोत्सवात यापूर्वी हजेरी लावली लावली आहे. यंदाही पं. आनंद भाटे, पं. राम देशपांडे,  बासरीवादक प्रवीण गोडिखडी, व्हायोलिनवादक यज्ञेश रायकर, गायिका दीपिका भागवत, ऋतुजा लाड यांच्यासारख्या दिग्गज आणि तरुण कलाकारांचे गायन-वादन ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारी (११ मार्च) संध्याकाळी ७ वाजता दीपिका भागवत आणि ऋतुजा लाड यांच्या सहगायनाने होणार आहे. यानंतर सुप्रसिद्ध गायक पं. राम देशपांडे व गंधार देशपांडे यांचे गायन सादर होईल.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, १२ मार्च रोजी तरुण गायक नागेश आडगांवकर यांचे गायन आणि प्रवीण गोडिखडी व त्यांचे पुत्र षडज गोडिखडी यांचे बासरीवादन होणार आहे, तर महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी, रविवार, १३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिनवादन होणार असून त्यानंतर  भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे शिष्य व किराणा घराण्याचे अग्रणी गायक आनंद भाटे यांच्या गायनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. त्यांच्या साथीला  तबल्यावर भरत कामत आणि संवादिनीवर सुयोग कुंडलकर असणार आहेत.

या कलाकारांना सर्वश्री सुयोग कुंडलकर व अजय जोगळेकर (संवादिनी), भरत कामत, यशवंत वैष्णव, मयंक बेडेकर, सिद्धार्थ पडियार (तबला) यांची साथसंगत असणार आहे. या तीनही दिवसांसाठी थिबा राजवाडय़ाच्या प्रांगणामध्ये सकाळी ११ वाजल्यापासून तिकीट विक्री  करण्यात येणार आहे. तसेच, आर्ट सर्कल रत्नागिरीतर्फे दरवर्षी राबवण्यात येणारी सदस्य योजना सालासाठी सुरू करण्यात आलेली असून त्यासंदर्भात अधिक चौकशीसाठी ९४२१६२१२१७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Swarabhaskar sangeet mahotsav in ratnagiri on occasion of birth centenary of bhimsen joshi zws

ताज्या बातम्या