ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात हुल्लडबाज पर्यटकांची माहिती देण्याऐवजी ती लपवून ठेवणाऱ्या चार जिप्सीचालक व गाईडस्ना निलंबित करण्यात आले असून, मध्यरात्री पर्यटकांनी धुडगूस घातल्याची खोटी माहिती समाजमाध्यमांतून प्रसारीत केल्याल्याबद्दल दोन पर्यटक व ग्रीन प्लॅनेट या वन्यजीव संस्थेवरही कारवाई केली जाणार आहे.
देशातील अग्रगण्य ताडोबा व्याघ्र प्रकल्पात पट्टेदार वाघ व बिबटय़ांच्या सहज व सुंदर दर्शनामुळे जगभरातील पर्यटकांची गर्दी दिसते. मात्र, मध्यरात्रीच्या सुमारास या प्रकल्पात सुरू असलेली पर्यटकांची घुसखोरी वन्यजीव संरक्षण कायद्याचे सर्रास उल्लंघन आहे, असा आरोप करत ग्रीन प्लॅनेटने वनाधिकारी तसेच पर्यटकांवर कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही तक्रार करण्यात आली. प्रत्यक्षात मध्यरात्री जंगल सफारी झालीच नाही, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ.जे.पी.गरड यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. समाजमाध्यमांमध्ये देशमुख व पारख नावाच्या पर्यटकाने वाघांची ही चित्रफित टाकली. १ मार्चला पहाटे ६.१२ मिनिटांनी जिप्सी ताडोबा बफर क्षेत्रात पर्यटन करत होती, हे चित्रफितीमधूनच स्पष्ट झाले आहे. फॉरेन्सिक लॅबकडून यासंदर्भातील संपूर्ण माहिती मागविली आहे. ही चित्रफित या दोन्ही पर्यटकांनी टाकल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसेच ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे प्रा.सुरेश चोपणे व अन्य सदस्यांनी कुठलीही शाहनिशा न करतांना माध्यमांना खोटी माहिती दिल्यामुळे त्यांच्यावरही करवाई करू, असेही गरड यांनी स्पष्ट केले.
या वेळी घटनास्थळी चार जिप्सी व चार गाईडस् होते. पर्यटकांना नेणाऱ्या या चारही जिप्सी व गाईडस्वरही निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती बफर झोनचे उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी दिली. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्वरूप येत असतांना जिल्ह्य़ातील काही वन्यजीवप्रेमींच्या पोट दुखू लागले आहे. त्यामुळेच कुठल्याही गोष्टीची शाहनिशा न करता खोटय़ा बातम्या देऊन प्रसिध्दीसाठी या मंडळींनी चंग बांधलेला आहे. मात्र, यामुळे ताडोबाची बदनामी होत आहे. हा प्रकार योग्य नाही, अशी खंत क्षेत्र संचालक डॉ.गरड यांनी बोलून दाखविली. ताडोबात काही गैरप्रकार सुरू असतील आणि ते या संस्थांनी उघडय़ावर आणले तर समजू शकते, असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tadoba national park visitors
First published on: 21-03-2015 at 03:43 IST