राज्यात वेगाने पसरणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेतली व ३१ मे पर्यंत राज्य करोनामुक्त करण्याचे आदेश दिले.

‘प्रत्येक जिल्हा ग्रीन झोन बनलाच पाहिजे. भले मग त्यासाठी तुम्ही कितीही कठोर भूमिका घ्या’, असे उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले. ‘स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आवश्यक निर्णय घेऊ शकतात. पण करोना नियंत्रणात आणण्याच्या बाबतीत कुठलीही हयगय अजिबात सहन करणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले’. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.

मुंबईत ६३२ नवे करोना रुग्ण, २६ मृत्यू, संख्या ९ हजार ७०० च्याही पुढे
मुंबईत गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे ६३२ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २६ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे मुंबईतील करोना रुग्णांची संख्या ९ हजार ७५८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत करोनाची लागण होऊन ३८७ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिकेने यासंदर्भातली माहिती दिली आहे.

महाराष्ट्रात करोनाचे नवे ८४१ रुग्ण, ३४ मृत्यू, संख्या १५ हजार ५०० च्या वर
महाराष्ट्रात करोनाचे ८४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या १५ हजार ५२५ इतकी झाली आहे. मुंबईची रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे तर महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही १५ हजार ५०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे.

बीडीडी चाळीला करोनाचा धोका
वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ वरळीच्या बीडीडी चाळीतही मोठय़ा प्रमाणावर रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे वरळी बीडीडी चाळीत करोनाचा धोका वाढू लागला आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून बीडीडीतील रहिवाशांना विनाकारण घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. बीडीडी चाळीत बुधवारपासून सात दिवस सक्तीने टाळेबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.