प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन
मुंबई : अन्य पक्षांना केवळ चर्चेत गुंतवून ठेवण्यात स्वारस्य असलेल्या काँग्रेससाठी आता थांबायचे नाही, एमआयएमशी मात्र चर्चा सुरू आहे आणि ती उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसार्पयच सुरू राहील, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड्. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत मांडली.
विधानसभा निवडणुकीतील युतीबाबत काँग्रेस व वंचित आघाडी यांच्यात चर्चा झाली. परंतु काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्वही युतीबाबत गंभीर आहे, असे वाटत नाही. उलट वंचित आघाडीला वापरून घेण्याचा काँग्रेसचा मानस दिसतो, अशी टीका आंबेडकर यांनी केली. दुसऱ्या बाजूला वंचित आघाडी युतीला तयार नाही, परंतु आमची तयारी आहे, असे भासवून काँग्रेस केवळ चालढकल करीत आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत युतीबाबत काँग्रेसचा जो अनुभव आला, तसाच आताही येत आहे. या पाश्र्वभूमीवर काँग्रेससाठी आता थांबणार नाही, केवळ चर्चेत गुंतून राहण्यात काही अर्थ नाही. मात्र एमआयएमच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा सुरू आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही चर्चा सुरू राहील, असे सांगून प्रकाश आंबेडकर यांनी त्या पक्षाबरोबर युती करण्याचे संकेत दिले.