राहाता : शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्थळ असलेल्या श्री साईबाबा संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘ टॉक वुईथ साई ’ या अत्याधुनिक एआय चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली. या नव्या सुविधेमुळे जगभरातील साई भक्त आणि पर्यटकांना श्री साईबाबा व शिर्डी संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती एका क्लिकवर सहज मिळणार आहे.

एआय चॅटबॉट सुविधेचे उद्घाटन आज शुक्रवारी साईबाबा संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्‍वनाथ बजाज, लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, आयटी विभागप्रमुख अनिल शिंदे, रमेश पुजारी, संजय गिरमे, टीसीएस कंपनीचे किरण कुमार रेड्डी व तन्‍मय मिराणे आदी मान्यवर उपस्थित होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘ टॉक वुईथ साई ’ या चॅटबॉट सुविधेमुळे जगभरातील साई भक्तांना श्री साईबाबांचे जीवनकार्य, शिकवणूक तसेच साईबाबा संस्थानविषयक सर्व माहिती सहज मिळणार आहे. यात ऑनलाइन सेवा, मंदिरातील नित्याचे धार्मिक कार्यक्रम, उत्सव व धार्मिक स्थळांबाबत माहिती मिळणार असून भाविकांना त्यांच्या शंका आणि प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळतील. सध्या ही सुविधा इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून लवकरच इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील ती सुरू करण्यात येणार आहे. साईबाबा संस्थान भक्तांच्या सेवेसाठी नेहमीच नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. या नवीन एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने साईभक्तांना अधिक जलद, अचूक आणि सुलभ माहिती मिळेल अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली.