१६ गावांच्या ३० वाडय़ांमध्ये दुर्भिक्ष

राज्याच्या अन्य भागाप्रमाणेच कोकणातही उन्हाळ्याच्या झळा तीव्रपणे जाणवू लागल्या असून रत्नागिरी जिल्ह्य़तील १६ गावांच्या ३० वाडय़ांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

गेल्या वर्षी पावसाळ्यात जिल्ह्यात एकूण वार्षिक सरासरीपेक्षा तब्बल सुमारे एक हजार मिलीमीटर कमी पाऊस पडला.

तसेच सप्टेंबरनंतर दिवाळीपर्यंत अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींचेही प्रमाण अत्यल्प राहिले. त्यामुळे जिल्ह्य़ातील  भूजल पातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत आणखी कमी झाली आहे. या वातावरणीय बदलाचा फटका आता जाणवू लागला आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जिल्ह्य़ातील १४ गावांच्या २३ वाडय़ांमध्ये पाणीटंचाई जाणवत होती. त्यानंतर अवघ्या एक आठवडय़ात त्यामध्ये आणखी २ गावांच्या ७ वाडय़ांची भर पडली आहे आणि आगामी काळात हे प्रमाण वाढतच जाण्याची भीती आहे.

जिल्ह्य़ाच्या ९ तालुक्यांपैकी दापोली, खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि लांजा या पाच तालुक्यांमधील गावे-वाडय़ांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू झाला असून त्यापैकी शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री रामदास कदम यांच्या खेड तालुक्यात पाणीटंचाई सर्वात तीव्र आहे. या तालुक्यातील ८ गावांच्या १६ वाडय़ांमध्ये टॅंकरद्वारे पाणी पुरवले जात आहे.