सांगली : भौगोलिक मानांकन लाभलेल्या तासगाव बेदाण्याला चिनी बेदाण्याचे आव्हान निर्माण झाल्याने बाजारात आठवड्यात दर २५ टक्क्यांनी घसरले आहेत. येत्या काही दिवसांत येऊ घातलेल्या सणाच्या हंगामात नेपाळमार्गे भारतीय बाजारपेठेत चिनी बेदाण्याची चोरटी आयात होऊ लागल्याने स्थानिक बेदाणा उत्पादक हैराण झाले आहेत. हा प्रकार लक्षात येताच बेदाणा असोसिएशनतर्फे केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान व व्यापार मंत्री पियुष गोयल यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे यावर तातडीने उपाय योजना करण्याची विनंती एका पत्राद्वारे केली आहे.
सांगली जिल्ह्यात यावर्षी बेदाणा उत्पादन कमी झाले असून, यामुळे दरात तेजी होती. हिरवा, पिवळा, लांबट सुंटेखानी या प्रतवारीनुसार चांगला दर मिळत होता. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तासगाव बेदाण्याला किलोला चारशे ते पाचशे रुपये सरासरी दर होते. मात्र, या आठवड्यात त्यात घसरण होत हे दर ३०० ते ४००वर आले आहेत. यामध्ये हिरवा ४०० ते ४५०, सुंठेखानी ४५० ते ६०० पिवळा ३५० ते ४०० रुपये किलो असे गेल्या आठवड्यात दर होते. मात्र, नेपाळमार्गे ३०० टन चिनी बेदाण्याची उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, कोलकाता बाजारात आवक झाल्याने सांगलीच्या बेदाण्याचे दर वरील प्रत्येक प्रतवारीमध्ये किलोला पन्नास ते शंभर रुपयांनी उतरले आहेत. यामुळे सांगली व तासगाव परिसरातील बेदाणा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे.
सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी २ लाख ४६ हजार टन उत्पादन होते. यंदा चालू वर्षी हे उत्पादन १ लाख ७० हजार टनांवर आले. उत्पादनात घट आल्यामुळे यंदा बेदाणा बाजार तेजीत होता. मात्र, ऐन सणाच्या वेळीच चिनी बेदाणा भारतीय बाजारपेठेत आणि तोही तस्करीच्या मार्गाने आयात होऊ लागल्याने याचा परिणाम स्थानिक बेदाणा बाजारातील दरावर झाला आहे.
चीनमधून कर चुकवून निकृष्ट बेदाण्यांची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असून, यामुळे द्राक्षउत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे नुकसान होत आहे. चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवावी. बेदाण्यांचे दर स्थिर ठेवून द्राक्ष, बेदाणाउत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, अशी मागणी बेदाणा असोसिएशनतर्फे केंद्रिय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान व व्यापार मंत्री पियुष गोयल यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.
श्रावणातील कृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र -दसरा व दिवाळी या सणांवेळी बेदाण्याला मागणी मोठी राहते. हे सर्व सण-उत्सव आगामी महिन्यात येत आहेत. कृष्ण जन्माष्टमी निमित्त उत्तर भारतात बेदाण्याचा प्रसाद म्हणून वापर केला जातो. या पार्श्वभूमीवर बेदाण्याची ही चोरटी आयात होत आहे. यामुळे चांगल्या बेदाण्याचे दर किलोमागे पन्नास ते शंभर रूपयांनी घसरले असून निकृष्ट बेदाण्याची विक्री होत आहे. – राजेंद्र कुंभार, अध्यक्ष बेदाणा असोसिएशन, सांगली.