सांगली : आखाडी जत्रेनिमित्त गावच्या ताईआईला गाभण असलेल्या मेंढीचा बळी देण्याची प्रथा या वर्षापासून बंद करत पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याचा निर्णय तासगाव तालुक्यातील चिखलगोठण येथील ग्रामस्थांनी घेतला असून याची अंमलबजावणीही करण्यात आली.
बहुसंख्य गावात ताईआईचे पडीक मंदिर पाहण्यास मिळते. या देवीला काही गावांत ताईबाई असेही म्हटले जाते. या देवीसाठी श्रावण सुरू होण्यापूर्वी आषाढ महिन्यात आषाढी एकादशीनंतर जत्रा करण्याचा प्रघात असून या जत्रेसाठी गर्भवती मेंढीचा बळी दिला जातो.
ताईआईसाठी गर्भवती मेंढीचा बळी देऊन मेंढीच्या पोटातील अर्भक जमिनीत पुरण्यात येते आणि मेंढीच्या मांसाची जेवणावळ भावकी, गावकीसाठी करण्यात येते. हा कार्यक्रम एका रात्रीतच पूर्ण करण्याचे बंधनही पाळण्यात येते. जर काही शिल्लक राहिले तर ते मातीतच पुरण्यात येते. या जेवणाला दुसऱ्या दिवशीचा सूर्य पाहू दिला जात नाही, अशीही पध्दत काही गावांत पाळली जाते.
चिखलगोठण येथे देवीला गर्भवती मेंढीचा बळी देण्याची प्रथा पूर्वांपार चालत आलेली होती. गर्भवती मेंढीचा बळी दिल्यानंतर तिच्या पोटात कधी एक तर कधी दोन अर्भक असायची. त्यांना त्याच जागी पुरण्यात येत होते. ही प्रथा अनेकांना अमान्य होती, मात्र, देवीचा कोप होईल म्हणून पारंपरिक पध्दतीने देवीची यात्रा गेल्या वर्षापर्यंत करण्यात येत होती.
चिखलगोठण गावच्या ताईआईची जत्रा साजरी करण्याबाबत उपसरपंच गुणवंत पाटील यांनी पुढाकार घेत ग्रामस्थांची बैठक बोलावली. या बैठकीत मेंढीचा बळी देण्याच्या विषयावर सांगोपांग चर्चा होऊन ही प्रथाच बंद करण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला. मेंढीचा बळी देऊन जत्रा साजरी करण्याऐवजी पुरणपोळीचा नैवेद्य देवीला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयानुसार शनिवारी (दि. १२ जुलै) ताईआईची जत्रा विनाबळीची साजरी करत पुरणपोळीचा नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आला. गर्भवती मेंढी बळीची प्रथा बंद करण्यासाठी सोसायटीचे माजी अध्यक्ष जगन्नाथ पाटील, ॲड. कृष्णा पाटील, जालिंदर पाटील, सुरेश पाटील, दगडू पाटील, आप्पासाहेब पाटील, तंटामुक्त ग्राम समितीचे माजी अध्यक्ष साहेबराव पाटील, श्रीकांत पाटील, अर्जुन पाटील, अधिकराव पाटील आदी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.