नवस फेडण्यासाठी स्वत:च्या दोन वर्षीय बालिकेस आश्रमात विधीवत सोडण्याचा प्रयत्न मनमाड येथील एका शिक्षकाकडूनच होत असून या घटनेशी शहानिशा करण्याची मागणी अंधश्रध्दा निर्मूलन समितीने बाल कल्याण समितीकडे केली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बाल कल्याण समितीने तातडीने गुरूवारी ‘चाईल्ड लाईन’ नाशिक संस्थेच्या पथकाला संबंधित शिक्षकाच्या घरी पाठवून छाननी सुरू केली आहे.
मनमाड येथे वास्तव्यास असलेल्या शिक्षकाने काही वर्षांपूर्वी मुलगा व्हावा म्हणून नवस केला होता. हा नवस फेडण्यासाठी संबंधिताने आपली दोन वर्षांची चिमुरडी धार्मिक प्रचारासाठी सोडून देण्याचा प्रयत्न चालविल्याची कुणकुण अंनिसला लागल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष महेंद्र दातरंगे, शहराध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांनी बाल कल्याण समितीकडे तक्रार केली. बाल कल्याण समितीने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने या प्रकाराच्या छाननीचे काम सुरू केले. विधीवत पूजन करून या बालिकेला आश्रमात दाखल केले जाणार होते. यामुळे समितीने चाईल्ड लाईन संस्थेच्या पथकाला तातडीने संबंधित शिक्षकाच्या घरी पाठवून छाननी केली. या संदर्भातील अहवाल शुक्रवारी बाल कल्याण समितीसमोर सादर होणार आहे. या मुलीच्या पालकांना समितीसमोर आपले म्हणणे मांडण्यासाठी बोलाविण्यात आले आहे. या संदर्भात संबंधित शिक्षकाशी संपर्क साधला असता त्याने असा कोणताही प्रकार नसल्याचे ‘लोकसत्ता’ला सांगितले.