मुंबई : अनुकंपा तत्वावरील शिक्षणसेवकांना शिक्षक पात्रता परीक्षेत सूट देण्यात आली होती. मात्र आता ही सूट काढून घेण्यात आली आहे. सप्टेंबर २०२४ नंतर नियुक्त झालेल्या शिक्षण सेवकांना आता पुढील पाच वर्षांत शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे. सप्टेंबर २०२९ पर्यंत ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. या मुदतीत सदर परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करून अनुकंपा धोरणानुसार त्यांना अन्य पदावर सामावून घेतले जाणार आहे.

अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षण सेवक पदावर अनुकंपा धोरणानुसार नियुक्त झालेल्या शिक्षणसेवकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली होती. ती सवलत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या मानकांशी विसंगत असल्याने अशा शिक्षकांना तीन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, शालेय शिक्षण विभागाने आता ही मुदत पाच वर्षांपर्यंत वाढवून शिक्षकांना दिलासा दिला.

त्यानुसार २ सप्टेंबर २०२४ रोजी अथवा नंतर ज्या उमेदवारांच्या सेवेस तीन वर्षे पूर्ण झाली आहेत त्यांचा शिक्षण सेवक कालावधी १ सप्टेंबर २०२९ पर्यंत वाढविण्यात येईल, पण त्यांना सेवासातत्य दिले जाणार नाही. त्यासाठी त्यांना सप्टेंबर २०२९ पर्यंत शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना पूर्वलक्षी प्रभावाने सेवासातत्य व अनुषंगिक लाभ दिले जातील. ही परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास संबंधितांची शिक्षण सेवक पदावरील सेवा समाप्त करून त्यांना अन्य पदावर सामावून घेण्याची कार्यवाही केली जाणार आहे.