गुंडाना पक्षात प्रवेश देण्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजप आता आणखी एका अडचणीत सापडण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपच्या माढा (जि. सोलापूर) तालुकाध्यक्षाच्या टेंभुर्णी येथील लॉजवर रविवारी (दि. २२) रात्री पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय होत असल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी डमी ग्राहक बनून सापळा रचून हा वेश्याव्यवसाय उघडकीस आणला आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या पाच मुली पोलिसांना आढळून आल्या. भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांचे हे लॉज आहे. त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला आहे. कोकाटे हे सध्या पसार झाले आहेत.
सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर टेंभुर्णी येथे संजय कोकाटे यांचे सुमित लॉज आहे. या लॉजमध्ये काही दिवसांपासून गैरव्यवहार सुरू असल्याचे पोलिसांना समजले होते. वेश्या व्यवसायानिमित्त सुमित लॉजमध्ये पाच मुली आणल्याची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक वीरेश प्रभू यांनी उपअधिक्षक प्रशांत स्वामी यांना कारवाईची सूचना केली होती. पोलिसांनी लॉजमध्ये डमी ग्राहक पाठवून सापळा रचला. या वेळी पोलिसांना लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या पाच मुली आढळून आल्या. ज्या कलाकेंद्रातून मुली आणण्यात आल्या होत्या, त्या कलाकेंद्र चालकासह सहा जणांविरोधात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक यशवंत माळी, (लॉज व्यवस्थापक), भागोजी रानबा मटकर, चंद्रकांत रामचंद्र वाघमोडे, रिक्षा ड्रायव्हर दिपक मच्छिंद्र गोंदील (सर्व रा. टेंभुर्णी), लॉज मालक संजय शिवालाल कोकाटे (रा. टेंभुर्णी) व अप्सरा लोकनाट्य कलाकेंद्रच्या महिला चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tembhurni madha bjp taluka president sanjay kokate prostitute business police raid
First published on: 23-01-2017 at 10:28 IST