छत्रपती संभाजीनगर – गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पोलिसांकडून पाच लाखांची लाच मागण्यात आल्यानंतर रक्कम देण्यासाठी तक्रारदाराने दहा तोळे सोन्याचे कडे तारण ठेवून चार लाख दिले. त्यानंतरही पुन्हा पाच लाखांची मागणी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवताच पडताळणीनंतर पथकाने लावलेल्या सापळ्यात अंमलदारास दोन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले. तर लोहारा (जि. धाराशिव) येथील पोलीस ठाण्याच्या प्रभारी निरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांवर मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अंमलदार अर्जुन तिघाडे याला दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. या प्रकरणात लोहारा ठाण्याचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस शिपाई आकाश भोसले आणि निवृत्ती बोळके यांच्याविरुद्धही बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी लोहारा येथील ३२ वर्षीय शेतकऱ्याने दाखल केली होती. या तक्रारीनुसार, तक्रारदाराला त्याच्या मित्राविरुद्ध दाखल खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी संबंधित पोलिसांनी पाच लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने जवळ एवढी रक्कम नसल्याने दहा तोळे सोन्याचे कडे तारण ठेवले. त्यानंतर पोलिसांनी तक्रारदाराच्या भावाकडून चार लाख रुपये स्वीकारले. त्यानंतरही आणखी पाच लाख रुपयांची मागणी पोलिसांकडून सुरू होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत पोलीस भोसले व बोळके यांनी तक्रारदाराचे सोन्याचे कडे स्वतःकडे ठेवून घेतल्याचे उघड झाले. प्रभारी अधिकारी कुकलारे यांनी तक्रारदाराच्या भावाकडून तीन लाख रुपये घेतल्याचे आणि उर्वरित दोन लाख रुपये भोसले किंवा तिघाडे यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर एसीबीने नियोजनपूर्वक मंगळवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहा वाजता भातागळी (ता. लोहारा) येथील शेतामध्ये सापळा रचला. तक्रारदाराकडून तिघाडे याने दोन लाख रुपये स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन व संबंधित वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आरोपींच्या घरांची झडती घेण्यासाठी स्वतंत्र पथक रवाना करण्यात आले.

या प्रकरणातील कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले (सोलापूर) आणि पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर (पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली, तर पर्यवेक्षण उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या देखरेखीखाली पार पडली. या कारवाईनंतर धाराशिव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.