चिंताजनक! राज्यात आणखी १० ओमायक्रॉन रुग्णांची नोंद; आरोग्य मंत्री राजेश टोपे माहिती देत म्हणाले….

महाराष्ट्रात आज एकूण १० ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे.

omicron Maharashtra
(प्रातिनिधीक छायाचित्र)

जगभरामध्ये ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूचा मोठ्या संख्येने प्रादुर्भाव होताना दिसत आहे. या नवीन विषाणूचा संसर्ग लहान मुलांनाही मोठ्या प्रमाणात होत असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच भारतामध्येही आतापर्यंत या विषाणूचे २३ रुग्ण आढळून आले होते. त्यात आणखी दहा जणांची भर पडली आहे. चिंताजनक म्हणजे एकट्या महाराष्ट्रातच आज ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेले दहा रुग्ण आढळले आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी याबद्दल माहिती दिली आहे.

“महाराष्ट्रात आज एकूण १० ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर सुमारे ६५ स्वॅब जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आमच्याकडे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी ३ लॅब आहेत. येत्या काळात नागपूर आणि औरंगाबादमध्ये आणखी लॅब उघडणार आहोत,” असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. दरम्यान, आज आढळलेले रुग्ण हे राज्यातील कोणत्या शहरातील आहेत, याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.

यापूर्वी मुंबईत ओमायक्रॉनचे दोन रुग्ण होते. आज आढळलेल्या रुग्णांसह राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णसंख्या २०वर पोहोचली आहे. तर देशपातळीवर ही संख्या वाढली आहे. देशामधील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण हे महाराष्ट्रामध्ये आहे.

कोणत्या राज्यात किती रुग्ण?
महाराष्ट्राखालोखाल राजस्थानमध्ये नऊ, कर्नाटकमध्ये दोन तर गुजरातमध्ये ओमायक्रॉनबाधित एक रुग्ण आढळून आलाय. देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही ५ डिसेंबर रोजी एक ओमायक्रॉन बाधित रुग्ण आढळून आलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ten omicron patients found in maharashtra hrc