बिपीन देशपांडे
छत्रपती संभाजीनगर : मराठवाडय़ासह शेजारच्या जिल्ह्यात मागील दोन वर्षांमध्ये तब्बल २०० हार्वेस्टर (गहू काढणीचे यंत्र)ची विक्री झाली आहे. यातून झालेली उलाढाल साधारणपणे ४२ ते ५० कोटींपर्यंतची आहे. शेतीसाठी भासणारी मजूर टंचाई, त्यांची वाढती मजुरी आणि त्यातून पैशांसह खर्ची होणारा वेळ पाहता गव्हाची काढणी (सोंगणी) हार्वेस्टरद्वारे करण्याकडे शेतकऱ्यांचा कल पाहता त्या यंत्राची खरेदी वाढल्याचे चित्र आहे.
हार्वेस्टरची दोन वर्षांमध्ये तीन लाखांच्या फरकाने किंमतवाढ झाल्याचेही व्यावसायिक किशोर अंकुर नागरे यांनी सांगितले. मराठवाडय़ातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमधून हार्वेस्टरची खरेदी झालेली आहे. छत्रपती संभाजीनगरजवळ मराठवाडय़ातील प्रमुख वितरक असले तरी येथून सर्वाधिक हार्वेस्टरची खरेदी ही परभणी व अहमदनगर जिल्ह्यांमध्ये झाली आहे. धाराशीव, नांदेड, जालना, लातूर, आदी सर्वच जिल्ह्यांसह कर्नाटक राज्याच्या सीमा परिसरातील गावांमधूनही खरेदी झालेली आहे. यातून दोन वर्षांमध्ये २०० हार्वेस्टरची विक्री झालेली आहे. दोन वर्षांपूर्वी २३ लाख रुपयांपर्यंत असलेल्या हार्वेस्टरची किंमतही वाढली आहे. आता एका हार्वेस्टरची किंमत २६ लाखांपर्यंत पोहोचली असल्याचे व्यावसायिक किशोर नागरे यांनी सांगितले. शेती कामातील मांडणी करताना एकनाथ अनंतपुरे यांनी जुन्या मळणी यंत्रामधून व नव्या हार्वेस्टरद्वारे गव्हाच्या काढणीवर होणाऱ्या खर्चाचे व बाजारमूल्यातील फायदे-तोटय़ातले गणित सांगितले. शेतीतील मजुरी वाढली आहे. एकरभर गहू काढणीसाठी एकापेक्षा अधिक मजूर लावावे लागतात. साधारण ३०० ते ४०० रुपये रोज मजुरी एकाला द्यावी लागते. कापणीनंतर गव्हाच्या पेंडय़ा बांधा, मळणी यंत्र आणून त्यातून काढा व नंतर गोण्यांमध्ये भरणा करा, यातून एकरी दहा हजारांपर्यंतचा खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो. त्याचे गणित बाजारभावाशी जुळवले तर शेतकऱ्यांच्या हाती फारसा नफा पडत नाही. वेळ आणि पैसाही खर्च होतो. महिला मजूर बऱ्याचवेळा मजुरीपेक्षा थेट गहूच मागतात. दहा किलोपर्यंत गव्हाची मागणी मजुरीच्या बदल्यात केली जाते, असे अनंतपुरे यांनी सांगितले.
व्यावसायिक किशोर नागरे यांच्या मते अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात एकरभर क्षेत्रावरील गहू हार्वेस्टरद्वारे काढला जातो. एकरी अडीच हजार रुपयांपर्यंतचा काढणीचा दर आहे. सात ते आठ लिटर डिझेलच्या खर्चातून दिवसभरात दहा एकपर्यंत काढणी केली जाते. त्यासाठी खास प्रशिक्षित हार्वेस्टर चालक असून दोन वर्षांपूर्वी पंजाबमधून त्यांना पाचारण करावे लागत होते. आता येथेच प्रशिक्षित चालक तयार केले आहेत. मराठवाडय़ात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र हे ९८ ते ९९ हजार हेक्टपर्यंतचे असले तरी पेरणी ही २०० टक्क्यांच्या आसपास म्हणजे दीड लाख हेक्टरवर आहे. त्यातून गव्हाचे वाढते क्षेत्र आणि मजुरांची टंचाई पाहता हार्वेस्टरची खरेदी वाढल्याचे शेतकरी आणि व्यावसायिक सांगत आहेत.