तुळजाभवानी देवीच्या मंदिराचा गाभारा आकाराने लहान आहे. भाविकांची सुरक्षितता ध्यानात घेऊन दर्शनासाठी काय उपाययोजना आखता येतील याबाबत आढावा घेण्याचे काम सुरू आहे. दर्शनरांगेत गर्दी न होता सुरक्षित अंतर पाळून तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यायल हवी त्याचा सविस्तर अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मंदिर संस्थानचे विश्वस्त असलेले तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी त्यावर काम करीत आहेत. शासनाच्या निर्देशांतर प्रत्यक्ष दर्शन सुरू  करताना हा अहवाल उपयुक्त ठरणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर समितीचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य सरकारने स्पष्टपणे निर्देश दिल्यानंतरच तुळजाभवानी देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. मात्र सामाजिक अंतर पाळून किती लोक दर्शन घेऊ शकतात, याबाबतची माहिती  संकलित करण्याच्या सूचना त्यापूर्वी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दिल्या आहेत. जिल्ह्यातील करोना संक्रमणाची परिस्थिती पाहता आणखी व्यवस्था वाढविण्याची गरज आहे. जिल्ह्यात चार हजार २०० खाटा उपलब्ध आहेत. त्यात आणखी अडीच हजार खाटांची वाढ करण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन खाटांची संख्या आजमितीला आठशे असून आणखी नऊशे खाटा वाढविण्याचे आव्हान असल्याचे दिवेगावकर म्हणाले. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंमलबजावणीसाठी अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. उस्मानाबाद शहरातील चार खासगी दवाखान्यांत महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सुविधा उपलब्ध आहे. मात्र अद्याप एकाही रुग्णाला त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याची माहिती आहे. या सर्व रुग्णालयांच्या डॉक्टरांची आपण बैठक बोलावली आहे. त्यांनी सहकार्याची भूमिका घ्यायला हवी. तशी भूमिका न घेतल्यास नाइलाजाने पुढील पावले उचलावी लागतील, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Testing for safe darshan at tulja bhavani temple abn
First published on: 30-08-2020 at 00:15 IST