मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ ओमराजे निंबाळकर यांनी ट्विट केला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातला एक संवाद आहे. त्यात बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताना दिसत आहेत. त्यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. दीड वर्ष महाराष्ट्र गद्दार गँगच्या भूलथापा ऐकतोय असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे.
काय म्हटलं आहे आदित्य ठाकरेंनी?
“बोलून मोकळं व्हायचं आणि निघून जायचं!” – घटनाबाह्य मुख्यमंत्री. ही ह्यांची मराठा आंदोलकांबद्दलची संवेदनशीलता?
खरंतर हीच ती गद्दार वृत्ती! गेलं १.५ वर्ष महाराष्ट्र ह्या गद्दार गँगच्या भूलथापा ऐकून घेतो आहे. या मिंधे-भाजपा सरकारवर मराठा समाज तर सोडाच पण देशातील एक तरी नागरिक विश्वास ठेवेल का?
तुरुंगात जायचं नाही आणि मुख्यमंत्री पदावर बसायचं म्हणून ज्यांनी ह्यांना घडवलं, वाढवलं, पदं दिली, सत्ता दिली त्यांचे नाही होऊ शकले, तर हे महाराष्ट्राचे काय होणार??? दुर्दैव आहे आमच्या राज्याचं की गद्दारी करून हे असलं खोके-धोके सरकार महाराष्ट्रातल्या नागरिकांवर लादलं गेलंय! असं ट्वीट आदित्य ठाकरेंनी केलं आहे.
मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमध्ये नेमका काय संवाद?
एकनाथ शिंदे – “आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.”
अजित पवार – “हो……येस’
देवेंद्र फडणवीस – “माईक चालू आहे.”
मराठा आरक्षणाबाबत जी चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ट्रोल केलं जातं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण
दुसरीकडे हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ट्विट करून एक आपलं म्हणणं मांडलं आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा निषेध केला आहे.
मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथिगृह येथे पत्रकार परिषदेपूर्वी आपला आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचा माईकवरील संवाद ‘सोशल मीडीया’वरून चुकीच्या पध्दतीने संपादित करुन फिरविणे अत्यंत खोडसाळपणाचे आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकार सुरुवातीपासून संवेदनशील असून कायद्याच्या चौकटीत बसेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्राधान्याने काम करीत आहे. तसेच मराठा आरक्षणाबाबत पहिल्यांदाच अशा सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्र बोलावून या विषयी त्यांचे एकमत घेण्यात आले आहे. शासनाने इतकी चांगली भूमिका घेतली असतांना मुद्दामहून काही विरोधक खोडसाळपणे आणि व्हिडीओ क्लिप चुकीच्या पद्धतीने संपादित करून लोकांच्या मनात गैरसमज पसरविण्याचे काम करीत आहेत हे अतिशय निंदनीय आहे. आमच्या एकमेकांमधील संवादाची मोडतोड करून संपादित करून दाखवून या घटकांनी जाणीवपूर्वक निंदनीय कृत्य केले आहे. शासन एकीकडे या संवेदनशील विषयावर ठोस भूमिका आणि निर्णय घेत आहे. अशा पार्श्वभूमीवर समाजात सोशल मीडियातून गैरसमज निर्माण करण्याचा कृत्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे.