अकोला जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) जिल्हापरिषद सदस्याला अपात्र करण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी शासनाकडे पाठवला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. तसेच, देवेंद्र फडणवीस फडतूस राजकारण करतात, अशी टीकाही नितीश देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सदस्य गोपाल दातकर यांच्या शेतातून जाणाऱ्या रस्त्याबाबत गावातील एका व्यक्तीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या तक्रारीवर तहसीलदारांनी पंचनामा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. नंतर तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेवून विभागीय आयुक्तांकडे अपात्रतेची प्रस्ताव पाठविला. २१ जुलैला पाठविलेला प्रस्ताव आयुक्तांनी दुसऱ्याच दिवशी प्रस्ताव नियमबाह्य असल्याचं सांगून जिल्हाधिकाऱ्यांकडे परत पाठविला. पण, २५ जुलैला विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला.

यावरून संतप्त झालेल्या नितीन देशमुख यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. “अकोला जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत सर्वजण देवेंद्र फडणवीसांना फडतूस संबोधतात. देवेंद्र फडणवीस फडतूस राजकारण करतात. त्याप्रमाणं अकोला जिल्ह्यातही फडणवीस फडतूस राजकारण करत आहेत. हे उदाहरण गोपाल दातकर यांचा प्रस्ताव पाठवून सिद्ध झालं.”

“पालकमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस जिल्ह्यात फिरकले नाहीत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाहीत. शेतकऱ्याला २५ टक्के विमा देण्याचं जाहीर केलं आहे. अद्यापही शेतकऱ्यांना विमा मिळाला नाही अथवा त्याबाबत बैठक घेतली. कधी जिल्हा नियोजन मंडळाची बैठकही घेतली नाही. दुसरीकडे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला अपात्र करण्याचं फडतूस राजकारण जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत आहेत,” असा आरोप नितीन देशमुख यांनी केला.