एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यांच्या या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे. तसंच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं. अशातच आजचा दिवस म्हणजेच २० जून हा जागतिक जागतिक गद्दार दिन जाहीर करा असं पत्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला लिहिलं आहे.

पत्रात काय म्हणतात संजय राऊत?

२० जून २०२२ रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे १६ आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या ४० आमदारांसह ५२ आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एका आमदाराने यासाठी ५० खोके (५० कोटी) रुपये घेतले त्यामुळे २० जून हा सर्व जगातील गद्दार दिन साजरा करण्यात यावा. यूनोने जागतिक गद्दार दिन घोषित केल्यास जगभरातील गद्दारांना एक व्यासपीठ मिळेल संयुक्त राष्ट्र संघटनने जाहीर केल्यानंतर २०१५ पासून २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा होतोय त्याप्रमाणे २० जून हा ‘जागतिक गद्दार दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातही उल्लेख

उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनी जे भाषण केलं त्या भाषणातही त्यांनी २० जून हा जागतिक गद्दार दिन आहे असं वक्तव्य केलं आहे. तर १८ जून रोजी जो शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यात आदित्य ठाकरेंनीही हेच वक्तव्य केलं होतं. २० जून हा जागतिक गद्दार दिवस म्हणून साजरा केला गेला पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. आता संजय राऊत यांनी थेट संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र लिहिलं आहे.