शिवसेनेचा सोमवारी ( १९ जून ) वर्धापनदिन आहे. त्यापूर्वी आज ( १८ जून ) शिवसेनेच्या वतीने ( ठाकरे गट ) वरळीत महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यातच ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसले आहेत. शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. तर, आज आमदार मनिषा कायंदे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

मनिषा कायंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत ( शिंदे गट ) प्रवेश करणार आहे. कायंदे यांच्यासह तीन माजी नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावरून खासदार विनायक राऊत यांनी मनिषा कायंदे यांच्यावर टीकास्र सोडलं आहे. ते ‘साम टीव्ही’शी बोलत होते.

हेही वाचा : “स्वतःच्या जातीचा…”, रक्तदान शिबिरात राज ठाकरेंकडून जातव्यवस्थेवर आसूड; म्हणाले…

“राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा…”

“सत्तापिपासू, स्वार्थी आणि संधीसाधू विधानपरिषेदच्या आमदार शिंदे गटात जाणार आहेत. याची कल्पना आम्हाला दोन महिन्यांपासून होती. विधानपरिषदेवर पुन्हा संधी मिळण्यासाठी गद्दारी आणि बेईमानी केली आहे. यांना राजकारणात काडीचीही किंमत नव्हती, तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. एवढा मोठा मानसन्मान प्राप्त करून दिला,” असं विनायक राऊतांनी सांगितलं.

“तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही”

“आज शिवसेना पक्षाला गरज असताना उपकारकर्त्यांशी बेईमानी करून सत्तेसाठी राजकारणाच्या डबक्यात उडी मारत आहेत. तुम्हाला नियती कधीही माफ करणार नाही,” असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा : वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, आदित्य ठाकरेंची दोन वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले, “मला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कोडगे शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्यासाठी निघाले आहेत”

“शिंदे गटाने खरेदी-विक्रीचा बाजार सुरू केला आहे. त्यांच्याकडे कोणतेही विचार नाहीत. केवळ उद्धव ठाकरेंना मानसिक त्रास द्यायचा हा एकमेक धंदा गद्दारांचा आहे. बाटगा अधिक कोडगा असतो… तसे हे कोडगे शिवसेनेच्या गळ्याला नख लावण्यासाठी निघाले आहेत. पण, त्यांचा मनसुबा स्वार्थी लोकांना जवळ घेऊन कधीही पूर्ण होणार नाही,” असा हल्लाबोलही विनायक राऊतांनी शिंदे गटावर केला आहे.