स्कूटरवरून घरी जाणाऱ्या महिलांवर अश्लील शेरेबाजी करून विनयभंग केल्याप्रकरणी ‘झोमॅटो’ कंपनीच्या दोन डीलिव्हरी प्रतिनिधींना अटक करण्यात आली आहे. घोडबंदर रोड येथून स्कूटरवरून घरी जाणाऱ्या दोन महिलांचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छोटेलाल सोनी (३५, रा. कोपरी, ठाणे), गजानन शिंदे (२९, रा. कळवा, ठाणे) अशी आरोपींची नावे आहेत. घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नल परिसरात सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राबोडी परिसरात राहणाऱ्या दोन मैत्रिणी वेदांत रुग्णालयात गेल्या होत्या. तेथून घरी परत येत असताना घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड सिग्नलजवळ त्यांच्या मागून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांना शिवीगाळ केली. महिलांनी याचा जाब विचारल्यानंतर मागे बसलेल्या आरोपीने एका महिलेचा विनयभंग केला आणि मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी तेथे उपस्थित वाहतूक पोलिसांनी आरोपींना रोखले आणि कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.