कारमधून आलेल्या युवकांनी तिवसा येथील दोन दुचाकीस्वारांवर देशीकट्टय़ातून दोन वेळा गोळीबार केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री अमरावती-नागपूर महामार्गावर शिवणगाव ते पिंपळविहीर दरम्यान घडली. या घटनेत दोघेही युवक सुदैवाने बचावले. तिवसा पोलिसांनी रात्रभर हल्लेखोरांना पकडण्यासाठी मोहीम राबवली. बुधवारी पहाटे चार वाजता कारंजा पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले. हल्ल्याचे कारण कळू शकले नाही.
तिवसा येथील धीरज मुंदेकर (२४) आणि धनंजय कराडे (२५) हे दोघे एम.एच. २७ / बी.ए. ९०४७ क्रमांकाच्या मोटरसायकलने अमरावतीहून तिवसाकडे जात असताना रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास मागाहून आलेल्या कारमधील युवकांनी त्यांची वाट अडवली. कारमधील एका युवकाने खाली उतरून त्यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. पण, त्यातून ते बचावले. या युवकांनी दुचाकीने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. थोडय़ा अंतरावर पोहोचल्यानंतर कारने त्यांचा पाठलाग केला. कारमधूनच त्यांच्या दिशेने पुन्हा गोळ्या झाडण्यात आल्या. दोन्ही युवकांनी यावेळीही प्रसंगावधान राखून आडवाटेने दुचाकी समोर नेली. धीरज आणि धनंजय यांनी काही वेळानंतर तिवसा येथे पोहोचून पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी लगेच शोधमोहीम राबवली. तिवसा येथील टोल नाक्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्याआधारे नजीकच्या पोलीस ठाण्यांमध्ये हल्लेखोरांविषयी माहिती देण्यात आली. कारंजा पोलिसांनी पहाटे चार वाजताच्या सुमारास रवींद्र जाधव (४७), रोहित पराते (३०, दोघेही रा. मुंबई), आशीष तोमर (३०, परतवाडा), उमेश पिहूलकर (३३, शेगाव) यांना ताब्यात घेतले. एम.एच.०१/ बी.बी. १९९० क्रमांकाच्या कारमधून आलेल्या या हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यांच्या जवळून देशीकट्टा आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. हल्ला कोणत्या कारणासाठी करण्यात आला, हे कळू शकले नाही. नांदगावपेठ पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.