मेहुणीच्या पोटातील मूल जन्माला येण्यापूर्वीच ते दत्तक देण्याच्या नावाखाली त्याची  ऑनलाइन विक्री करण्याचा प्रस्ताव पुढे करून पैशांची मागणी करणारे एक धक्कादायक प्रकरण सायबर पोलीस व क्रांती चौक पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणी निकिता खडसे व शिवशंकर तांगडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी दिली आहे.

या प्रकरणाबाबत सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी विस्तृतपणे दिलेल्या माहितीनुसार, निकिता खडसे व शिवशंकर तांगडे यांनी फेसबुकवरील आपल्या खात्यात एक संदेश पाठवला होता. शिवशंकरने त्याच्या संदेशात म्हटले होते की, त्याची मेहुणी सात महिन्यांची गरोदर असून तिला तिच्या नवऱ्याने सोडले आहे. तिचे दुसरे लग्न करायचे आहे. त्यामुळे मेहुणीने बाळाला जन्म दिल्यानंतर ते विक्री करायचे आहे. त्याबदल्यात पैशांचीही त्याने मागणी केली होती. शिवाय निकिता खडसे व शिवशंकर तांगडे यांनी पीपल अ‍ॅडॉप्शन ग्रुपमधून दत्तक मूल घेऊ इच्छिणाऱ्यांची यादी देखील मिळवली होती. तसेच त्यातील काहींशी त्यांच्या मोबाइलवर संपर्क करून आर्थिक व्यवहाराच्या अनुषंगाने चर्चाही केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संदर्भातील माहिती फेसबुकवर दिसताच शिवशंकर तांगडे याचा पत्ता सायबर पोलीस ठाण्याच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी व त्यांच्या पथकाने शोधला. शिवशंकर तांगडे हा मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील असून सध्या तो औरंगाबादजवळील रांजणगावातील शेणपुंजी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणी महिला व बाल विकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी तक्रार दाखल केल्यानंतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.