महाविकास आघाडी सरकारवर सुरुवातीला तीन चाकाचं सरकार म्हणून टीका झाली. हे तीन चाकाचं सरकार टिकणार नाही, असंही बोललं गेलं. पण विरोधकांना हे लक्षात आलं नाही की या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेनं दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले आहेत. महाविकास आघाडी सरकारचा वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री म्हणाले, “जनतेचा आशीर्वाद का मिळतोय कारण जनतेला माहिती आहे की, हे सरकार केवळ राजकारण करण्यासाठी एकत्र आलेलं नाही. सुरुवातीला आपल्यावर टीका झाली होती की हे तीन चाकाचं सरकार आहे. पण त्यांच्या हे लक्षात आलंच नाही की या सरकारचं चौथ चाक जे आहे ते आपल्या जनतेच्या विश्वासाचं आहे. जनतेच्या विश्वासामुळं आपण हा सरकाररुपी रथ पुढे नेऊ शकलो आहोत. सरकारवर  जर जनतेचा विश्वासच नसता तर आपण पुढे चालूच शकलो नसतो. आपल्याला विरोधकांची गरजही पडली नसती.”

“गेल्या वर्षभरात जे आमचं टीमवर्क झालं आहे. ते पाहिल्यानंतर हे सर्व माझे सहकारी त्यात सर्व अनुभवी आहेत. अनुभव नसणारे कोणी नसतील असं त्यांच्या कामावरुन वाटतंच नाही. सगळेच जण फार छान काम करत आहेत. वर्षभरापूर्वी अनेकांना असं वाटतं होतं की हे सरकार अस्तित्वाच येऊच शकत नाही. शिवसेनेला ते गृहित धरुन चालत होते. की शिवसेना फरफटत येणारच. पण शिवसेना कधीही फरफटत जाण्याऱ्या पक्षापैकी आधी नव्हती, उद्याही नसेल आणि कधीच नसणार,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावलं.

एकत्र आल्यानंतर आपण आशीर्वाद कमावले

“एका गोष्टीचं मला आश्चर्य म्हणा किंवा आनंद आहे, समाधान आहे. आपले तीन्ही पक्ष आणि आपले सहकारी जे अपक्ष म्हणून निवडून आले. हे सर्व वेगवेगळ्या विचारांचे लोक आहेत. आपल्याला एकमेकांशी संघर्ष करण्याचा खूप अनुभव आहे. एकमेकांशी संघर्ष करत आपण इथंपर्यंत आलो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की, संघर्ष केल्यानंतर आपण काय गमावतो आणि एकत्र आल्यानंतर आशीर्वाद कसे कमावतो याचा आपण एक वर्ष अनुभव घेत आहोत. यामागे शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

नैसर्गिक आपत्तीत देखील राजकारण केलं जात हे क्लेशकारक

गेल्यावर्षभर कठीण काळ होता आजही आहे त्यातून आपण बाहेर पडलेलो नाही. नैसर्गिक आपत्ती ठीक आहे, ती मोठीचं असते ती आपल्या हातात नसते. पण काही वेळेला नैसर्गिक आपत्तीत देखील राजकारण केलं जातं हे फार क्लेशकारक असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The fourth wheel of the mahavikas aghadi government is the people of maharashtra says cm uddhav thackeray aau
First published on: 03-12-2020 at 18:46 IST