गारपीटग्रस्तांना दोन दिवसांत मदत न दिल्यास मराठवाडाभर रस्त्यावर उतरून संघर्ष करू, असा इशारा भाजप नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी ठिकठिकाणी भेट दिल्यानंतर दिला.
लातूर तालुक्यातील भातांगळी व भातखेडा येथील गारपीटग्रस्तांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. हवामान खात्याने गेल्या ११० वर्षांत अशी आपत्ती देशावर ओढवली नसल्याचे म्हटले आहे. सध्याच्या स्थितीत पंचनामे व सर्वेक्षण करणे यात न गुंतून न पडता सरकारने तातडीने मदत केली पाहिजे, असेही मुंडे म्हणाले. वीजबिल व पीककर्ज माफ करावे, गारपीटग्रस्तांना तातडीने मदत करावी याचा पुनरुच्चारही त्यांनी केला. मुंडे यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, रमेश कराड, गोिवद केंद्रे, गणेश हाके, अविनाश कोळी, सुधीर धुत्तेकर आदी उपस्थित होते. शेतक-यांनी मुंडे यांच्याकडे गारपीटग्रस्त अडचणीत असताना लोक साधे भेटायलाही येत नाहीत, असे सांगून याबद्दल खंत व्यक्त केली. मुंडे शेतक-यांशी बोलत असताना कार्यकर्त्यांचीच अधिक रेटारेटी होत होती. ते पाहून, मला किमान गारपीटग्रस्तांशी बोलू तरी द्या, या शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना खडसावले.