Maratha Arakshan : महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं याकरता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरीही २ जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे. या सर्वापार्श्वभूमीवर मराठा अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“मनोज जरांगे पाटलांनी नवा अध्याय लिहिला आहे. मी अनेक वर्षे मराठा आरक्षणासाठी काम करतोय. इतिहासही वाचला आहे. पण, एकही मुख्यमंत्री मराठा समाजाच्या बाजूने काम करतोय असं आढळलं नाही. आरक्षणासाठी काम करतोय असं फक्त दाखवलं जातं. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच मराठ्यांसाठी काम करत आहेत. आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी दिशा चुकली असेल. त्यामुळे आरक्षण फिस्कटलं असेल. पण आता सरकार ज्या पद्धतीने साथ देतंय ते प्रथमच घडतंय. सरकारने जरांगे पाटलांसोबत चर्चा करून आश्वासन दिलंय. ही नवी सुरुवात आहे. मराठा समाजाने यावर विश्वास ठेवायला हरकत नाही”, असं बाळासाहेब सराटे म्हणाले.

हेही वाचा >> “सरकार कोसळलं तर आरक्षण…”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“महाराष्ट्रातील विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील मराठ्यांना कुणबी दाखले मिळाले आहेत. मराठवाड्यातील पाचशे-हजार जणांना दाखले मिळाले आहेत ही आजची माहिती आहे. मराठवाड्यात कुणबी नाहीच, अशी गेल्या ६० वर्षांपासून धारणा होती. ही धारणा आता बदलली आहे. मरठा हे कुणबी आहेत हे सिद्ध झालंय हे या आंदलनाचे यश आहे. महाराष्ट्रात सरसकट कुणबी आहेत, हे जमिनीवर सिद्ध झालंय. भूमी अभिलेख कार्यालयात ३३ आणि ३४ नमुना आहे. १८८१ चा जनगणनेचा नमुना आहे. जात, व्यवसाय आणि गावातील प्रत्येक कुटुंबाचं वर्णन या नमुन्यात आहे. म्हणजे १८८१ पासून हा समाज कुणबी आहे हे सिद्ध झालंय”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

“समिती ज्या पद्धतीने काम करतेय त्यानुसार ते ५० हजार नोंदीपर्यंत पोहोचतील, त्यामुळे २० ते २५ लाख लोकांना प्रमाणपत्र मिळण्याची सोय होईल. जी तुरळक गावं राहतील त्यांच्याबाबत सरकारसोबत बोलणं झालेलं आहे. त्यामुळे सरसकट शब्दाबाबत वाद घातला जातो आणि प्रकरण चिघळवलं जातं हे चुकीचं आहे. जरांगे पाटील सरसकट म्हणतात याचा अर्थ की जो मागेल त्याला प्रमाणपत्र मिळायला पाहिजे”, असंही ते म्हणाले.

हेही वाचा >> “फडणवीसांना गृहखातं झेपत नसल्याचा आणखी एक पुरावा…”, सुप्रिया सुळेंची टीका; म्हणाल्या, “छत्तीसगडमध्ये प्रचारासाठी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“कुणबी जातीच्या नोंदी १०० टक्के सापडल्या तर त्याला नाही म्हणायची कोणाची हिंमत आहे? ही केवढी मोठी उपलब्धी आहे, १९६७ यादीशी मराठा समाज जोडला गेलाय. या आंदोलनामुळे मराठा समाज मूळ आरक्षणात गेलाय हे यश आहे”, असंही ते म्हणाले.