सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालय अलिबाग येथे उभारण्यात आलेल्या लोकनेते स्व. अॅड. दत्ता पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण आमदार मीनाक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
रायगड जिल्हा परिषदेतील शेकापचे प्रतोद पंडित पाटील, अॅड. दत्ता पाटील को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, रघूजी आंग्रे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळा तेलगे, पंचायत समितीचे माजी सभापती अॅड. आस्वाद पाटील, जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, सर्वाजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील, कार्याध्यक्षा शैला पाटील, उपनगराध्यक्षा सुरक्षा शाह, आवस ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना राणे, कोकण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय पाटील, जेएसएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, अॅड. विलास नाईक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
लोकनेते स्व. अॅड. दत्ता पाटील हे वकील होते, त्याच प्रमाणे ते उत्तम राजकारणी होते. खेडय़ापाडय़ातील गरीब मुलांना शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. कोकण एज्युकेशन सोसायटीच्या मध्यमातून खेडय़ापाडय़ात शाळा काढून गरिबांना शिक्षणाचे दार उघडे केले. त्यांनी लोकसेवेचा चांगला आदर्श घालून दिला. नवख्या लोकांवर जबाबदारी टाकून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळे चांगले कार्यकत्रे तयार होऊ शकले, असे आमदार मीनाक्षी पाटील म्हणाल्या.
अॅड. दत्ता पाटील हे वक्तशीर होते. त्यांचा वक्तशीरपणा सर्वानी घेतला पाहिजे. त्यांनी तळागाळातील लोकांसाठी वकिली केली. शेवटपर्यंत ते तळागाळातील लोकांसाठीच लढले, असे जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रसाद पाटील म्हणाले.