करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या तळोजा गावातील व आसपासच्या गावांमधील ग्रामस्थांसाठी, मोहम्मद यासिन पटेल यांनी जून महिन्यात एक आरोग्य केंद्र सुरू करण्याची एक संकल्पना मांडली होती. आसपासच्या परिसरात करोनाचा प्रादुर्भाव दिसू लागल्यामुळेच त्यांनी या गावातील जवळपास दहा हजार ग्रामस्थांच्या आरोग्य सेवांसाठी ही संकल्पना सुचवली होती. या धर्तीवर येथील स्थानिकांना एकत्र येऊन ही कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी मेळावा घेतला व प्रयत्न केला. जो यशस्वी झाल्याचे आज दिसत आहे.

त्यांनी अशा आरोग्य केंद्राची कल्पना केली होती, जिथे रुग्णांना २४ तास मदत मिळेल. करोनाची साथ आल्यानंतर सुरूवातीच्या काळात अनेक स्थानिक नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. त्यावर त्यांनी स्वतःच नवीन उपाय शोधून काढला.

पटेल सांगतात, “हे सर्व काही जून महिन्यात सुरू झालं जेव्हा आमच्या गावातील तीन जण करोना पॉझटिव्ह असल्याचं आढळलं व त्यातील एकचा मृत्यू झाला. आमच्या भागात भीतीचे वातावरण होतं, जरासा जरी आजार असलेल्याकडे देखील संशयाने पाहिले जात होतं. याचा अर्थ येथील लोकांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा मिळत नव्हत्या, त्यामुळे आम्हाला वाटलं की आपल्याला या प्रश्नावर काहीतरी करण्याची गरज आहे.”

यानंतर स्थानिकांनी तातडीने एक समिती स्थापन केली व येथील एका उर्दू शाळेचे तात्पुरत्या स्वरुपात एका आरोग्य केंद्रात रुपांतर करण्याच्या परवानगी द्यावी ही विनंती घेऊन, पनवेल महापालिका गाठली. करोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने महापालिकेकडूनही तात्काळ सहमती दर्शवण्यात आली.परवानगी तर मिळाली मात्र स्थानिकांना वैद्यकीय सुविधांसाठी घेण्यासाठी पैसे नसल्याने, यासाठी समाजापर्यंत पोहचण्याचा निर्णय घेतला. आम्ही समाजाकडे निधी मागितला आणि एका दिवसात जवळपास चार लाख रुपये जमा झाले. त्यानंतर आम्ही वैद्यकीय मदत मिळवली व शाळेचे तात्पुरत्या स्वरुपात आरोग्य केंद्रात रुपांतर केले. असे पटेल यांनी सांगितले.

स्थानिक स्वयंसेवक डॉक्टरांकडून या आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली जाते. यानंतर जून पासून आजतागायत गावात एकही करोना रुग्ण आढळलेला नाही. स्थानिक नागरिक सांगतात की त्यांनी कोरना व्यतिरिक्त असलेल्या सर्व आरोग्य विषयक समस्यांसाठी वेळेवर सुविधा पुरवल्या आहेत.

उपचाराचे शुल्क देखील निश्चित करण्यात आलेले आहे. प्रत्येक रुग्णास १०० रुपये द्यावे लागतात शिवाय रुग्णालयाकडून त्यांना स्वस्त दरात औषधी देखील दिली जाते.या रुग्णालयात दररोज किमान १०० रुग्णांव उपचार सुरू आहेत. या रुग्णालयाबद्दल माहिती ऐकल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातून देखील रुग्ण या ठिकाणी उपाचरासाठी येत आहेत.