धुळे : औद्याोगिक विकासाला चालना देण्यासाठी प्रशासकीय पातळीवर अनेक योजना राबविण्याची आणि नव्या उद्याोग समूहांसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याची तयारी ठेवली जात असली, तरी प्रत्यक्षात दुष्काळी स्थिती आणि रोजगाराचा अभाव यामुळे गेल्या काही वर्षांत धुळे जिल्ह्याचे दरडोई उत्पन्नवाढीचे लक्ष्य अपेक्षेप्रमाणे साधता आलेले नाही.

जिल्ह्याचे दरडोई निव्वळ उत्पन्न एक लाख ३८ हजार ४९० इतके आहे. जिल्ह्यातील प्रमुख अवधान (धुळे) शिवारातील औद्याोगिक वसाहतीत जवळपास ३५० लघु उद्याोग आहेत. अवधान औद्याोगिक क्षेत्राला त्याच भागातील जलाशयातून पाणी पुरविण्यात येते. औद्याोगिक क्षेत्रासाठी हरणमाळ पाणीपुरवठा योजना शासनाने मान्य केली आहे. धुळे आणि नरडाणा (शिंदखेडा) औद्याोगिक वसाहतीत जागा उपलब्ध करून दिल्याने या ठिकाणी काही नवीन मोठे उद्याोग आल्यास आपोआपच लघु उद्याोगही विकसित होतील, अशी अपेक्षा आहे. कृषी व खाद्यापदार्थसंबंधित उद्याोगांसाठी विशेष दर्जा द्यावा, अशी मागणी आहे. शेतमालाला पूरक असणाऱ्या मोठ्या प्रक्रिया उद्याोगांना चालना मिळू शकते.

जिल्ह्यात गेल्या दोन दशकांत जे उद्याोग, व्यवसाय उदयास आले ते कृषीआधारित आहेत. तेल गिरण्या, यंत्रमाग, सूत गिरण्या, स्टार्च उद्याोग, रसायन उद्याोग शहरांबरोबर ग्रामीण भागातही सुरू झाले आहेत. जिल्ह्यात सुरू असलेला शिरपूर तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना बंद पडला आहे.

हेही वाचा >>>किल्ले रायगडाची पायवाट दोन दिवस बंद राहणार, रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांचे बंदी आदेश

धुळे येथे कापड गिरणी, सूत गिरणी, यंत्रमाग, तेल गिरण्या, रसायन उद्याोग, सिमेंट पाइप फॅक्टरी, सॉ मिल असे उद्याोग आहेत. दोंडाईचा येथे स्टार्च फॅक्टरी खासगी तत्त्वावर कार्यरत आहे. धुळे आणि शिंदखेडा तालुक्यातील २०० गावांना सिंचनाची आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय निर्माण करणाऱ्या सुलवाडे-जामफळ सिंचन योजनेचेही काम प्रगतिपथावर आहे.

दळणवळणाची स्थिती समाधानकारक

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या धुळ्याच्या औद्याोगिक विकासासाठी महामार्गांचे चौपदरीकरण उपयोगी ठरले. धुळे ते सोलापूर महामार्ग, सुरत-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाला केंद्र शासनाने मंजुरी देत त्याचा पहिला टप्पा म्हणून बोरविहीर धुळे ते नरडाणा या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. भूसंपादनाची प्रक्रिया ९० टक्के पूर्ण झाली आहे. लवकरच प्रत्यक्ष रूळ टाकण्याच्या कामालाही सुरुवात होईल.

टायटल प्रायोजक :

● सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

पॉवर्ड बाय :

● महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित

● सिडको

नॉलेज पार्टनर :

● गोखले इन्स्टिट्यूट, पुणे</strong>