काँग्रेसला फोडण्याची काही गरजच नाही. कारण त्यांच्यातले काही लोक यायला तयार आहेत असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. राजकारणात सध्या नवा पॅटर्न आला आहे. पूर्वी लोक धोतर नेसायचे नंतर पँट घालू लागले. तसा आता राजकारणाचाही पॅटर्न बदलतो आहे. बदलणाऱ्या स्वरुपात काय काय बदलू हे आपण पाहिलं. या पॅटर्नची सुरुवात उद्धव ठाकरेंनी केली.विचारांशी सुसंगत नसलेली अनैसर्गिक युती त्यांनी केली. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हा पॅटर्न पाहिला. शेवट भाजपाने केला आहे. पॅटर्न बदलाची ही सुरुवात होती. हे सगळं लोकांना पचनी पडत नाही असंही बच्चू कडूंनी म्हटलं आहे.
आपला पक्ष वाढला पाहिजे असं प्रत्येकालाच वाटतं
प्रत्येकच पक्षाला हे वाटतं की आपला पक्ष वाढला पाहिजे आणि तो पक्ष मोठा झाला पाहिजे. असं वाटण्यात काही गैर किंवा चुकीचं नाही. आता दोन तीरांवरच्या गोष्टी झाल्या आहेत. आधी एका काठावरच्या गोष्टी राजकारणात राहिल्या नाहीत. सत्ता आणि विचार यांची सांगड जुळत नाही हे आपण पाहतो आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्या पद्धतीने पावलं टाकतो आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सत्तेत येऊन मुख्यमंत्री होऊ शकतो तर आमची तर केंद्रात सत्ता आहे. तो ट्रेलर २०२२ ला पाहिला आता पिक्चरही लोकांनी पाहिला. विचार म्हटलं तर राष्ट्रवादीचा विचार सर्वधर्मसमभाव आणि पुरोगामी विचार आहे. शिवसेना आणि भाजपा यांचा विचार हिंदुत्ववादी आहे. पण आत्ता सत्तेसाठी सगळ्यांनी विचार बाजूला ठेवला आहे असं दिसतं आहे असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “अजित पवारांकडे अर्थखातं जायला नको, कारण…”, चार-पाच आमदारांचा उल्लेख करत बच्चू कडूंचं मोठं विधान
सगळेच जण वाट बघत आहोत
भरत गोगावलेच नाही तर बरेच जण सध्या फोनची वाट पाहात आहेत. दोन खासदार बसले होते ते बोलत होते तुला फोन आला का? एकाने खोटं सांगितलं मला फोन आला. त्यानंतर चार-पाच जण दिल्लीला पळाले. निकालाची जशी वाट पाहणं असतं तसं फोनची वाट बघणं पाहिली चालली आहे. सगळ्यांनाच वाटतं की मंत्री व्हावं. त्यांनी वाट बघण्यात वाईट काय? चांगला कॉल आला पाहिजे त्याची वाट सगळेच बघतात असंही कडू यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “मुंबईत राहिलं तर मंत्रीपद मिळतं आणि गावी राहिलं तर…”, बच्चू कडूंचं मंत्रीमंडळ विस्तारावर वक्तव्य
मी नाराज वगैरे अजिबात नाही
घातल्या पाण्याने गंगा वहात नाही. आमच्याकडे दुर्लक्ष वगैरे काहीही होत नाही. आम्ही काम करुन स्वतःच्या मेहनतीवर पुढे आलो आहोत. प्रत्येकाची कमांड ही त्याच्या कार्यावर असते. कुणी दुर्लक्ष केलं म्हणून आम्ही डुबणार असं नाही. मी नाराज असण्याचं काही कारण नाही मी आत्ताच आलूबोंडा खाऊन आलो. आमचा सगळा अभ्यास झाला आहे. मी वारंवार सांगतो आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना विचारा की मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार. आम्ही लाईनमध्ये उभे आहोत आणि तुम्ही आम्हालाच विचारत आहात. त्यापेक्षा अमित शाह आणि नरेंद्र मोदींनाही विचारायचं ते विचारा असं मिश्कील उत्तर बच्चू कडू यांनी दिलं आहे.