राज्यात मागील काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उचललेल्या भोंग्याच्या मुद्य्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यात राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी ३ मेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यामुळे यावरून देखील टीका,टिप्पणी सुरू आहे. या मुद्य्यावरून राज्यात सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या वेब-उपक्रमाच्या समारोप सत्रात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली.

सध्या जो ताजा मुद्दा निर्माण झाला आहे, गाजला आहे, गाजवला गेला आहे तो म्हणजे भोंग्याचा या लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “मला तरी तो गाजलेला मुद्दा वाटत नाही. कारण, मी तुम्हाला परत एकदा सांगतो भोंग्याचा विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा देशासाठी आहे. त्यासाठी मागील आठवड्यात गृहमंत्र्यांनी एक सर्वपक्षीय बैठक घेतली आणि त्यात असंच ठरलं की, हा निर्णय…जसं नोटाबंदी देशभर केलीत ना?, लॉकडाउन देशभर केला ना? मग भोंगाबंदी देशभर करा ना. कारण, सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे, त्यामध्ये आपले केंद्र सरकार ही एक पार्टी होती, केंद्र सरकारने तो आदेश काढला पाहिजे. त्यामध्ये देखील तो जर का निकाल तुम्ही नीट वाचला, तर तो सर्वधर्मीयांना आणि सर्वांना तो लागू आहे. त्यामुळे नुसते एखादे भोंगे काढा असं नाही, मग आपल्याला सर्व धर्मीयांना ते पाळावं लागेल.”

तसेच, “पण मला तो मुद्दा आता गौण वाटतोय, कारण माझ्यासमोर प्रश्न आहे तो म्हणजे राज्याला पुढे न्यायचं आहे, गुंतवणूक वाढवायची आहे. थांबलेलं अर्थचक्र हे परत फिरवायचं आहे, हे मोठं आव्हान आहे.” असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर, उत्तर प्रदेशमध्ये जर भोंगे काढले जात असतील तर महाराष्ट्रात का असं होत नाही? यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “उत्तर प्रदेशमध्ये करोनाच्या काळात गंगेत मृतदेह फेकून दिली होती. त्यांचे शेवटचे विधी देखील झालेले नाहीत. ७० पेक्षा अधिक मुलांचा ऑक्सिजनविना तडफडून मृत्यू झाला, अनेकांना करोना काळात देखील ऑक्सिजन मिळाला नाही. त्यानंतर भयानक परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र होतं. सगळी मोठी मैदानं स्मशानभूमी बनले होते. त्यामुळे तो मुद्दा जास्त भयानक आणि भीषण वास्तव सांगणारा आहे. मला माझ्या जनतेच्या जीवाची पर्वा आहे. तिथे भोंगे काढले परंतु जे परवानगी मागतील आणि ज्यांना ते परवानगी देतील तिथे परत भोंगे चढणार आहेत. त्यामध्ये सर्वांनाच परवानगी लागणार,सर्वांनाच आवाजाची मर्यादा पाळावी लागेल. यातील खरा मुद्दा अजान नसून आवाज असा आहे, हे ज्यांना कळत नाही ते अजाणतेपणाने बोलतात असं मला वाटतं.” असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.