मागील १५ दिवसात महाराष्ट्रातील राजकारणात उलथापालथ झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहेत. ३ आणि ४ जुलै रोजी विधानसभेत विशेष अधिवेशन पार पडल्यानंतर अखेर १५ दिवसांनी वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे आपल्या मतदार संघात परत गेले आहेत. यावेळी जनतेनं त्यांचं जंगी स्वागत केलं आहे.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी बंडखोरी का केली? याचं उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं की, “गेल्या ३० वर्षापासून शिवसेनेत काम करत आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, ‘माझ्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा’, अज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. याचा आम्हाला आनंद आहे. बंडखोरी का घडली याबाबत एकनाथ शिंदे यांनी काल टीव्हीच्या माध्यमातून सर्व सांगितलं आहे. त्यामुळे मी आता अधिक बोलणार नाही.”

“पण मी एवढंच सांगू इच्छितो की, एकाच वेळी ५० आमदार पक्षातून निघून जातात, ही गोष्ट समजण्यासारखी आहे. यासाठी मी उद्धव ठाकरेंना दोष देणार नाही, परंतु उद्धव साहेबांच्या आजूबाजूला जे चार बडवे आहेत, त्यांना दोष देणार आहे. त्यांनीच आमच्यासारख्यांना बाजूला काढण्याचं काम केलंय,” असे गंभीर आरोप बोरणारे यांनी केले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे बोलताना रमेश बोरणार म्हणाले की, “एकनाथ शिंदे साहेबांनी कालच सांगितलंय की, बाळासाहेब ठाकरे आमचे दैवत आहेत. आम्ही त्या घराण्याला कधीही विसरू शकत नाहीत. आम्ही बंडखोरी केली नाही, आम्ही उठाव केला आहे. अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्याचा कानमंत्र आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी दिला आहे. मी तालुक्याच्या विकासासाठी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. वैजापूर तालुक्यात जे पाच प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्याचं काम मी करणार आहे. माझ्याकडून जर काही चुकीच झालं असेल तर २०२४ ला जनता मला माफ करणार नाही. पण जर मी विकासाच्या बाजूने गेलो असेल, तर जनता मला नक्की पुन्हा संधी देईल,” असंही बोरणारे म्हणाले.