Difference Between Devendra Fadnavis And Ajit Pawar: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून लाखो मराठी आंदोलक मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबई विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. अशात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घटनेत बदल करावी असे विधान केले होते. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. त्यावर अजित पवार म्हणाले होते की, हे लोक अनेक वर्षे सत्तेत होते, त्यामुळे मला जास्त बोलायला लावू नये.
आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचे वक्तव्य आणि त्यावर अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर टिप्पणी केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात फरक असा आहे की, देवेंद्र फडणवीस जे खरे आहे ते ही बोलणे टाळतात, ते माणसे जपतात. अजितदादा आमचे फटकळ आहेत आणि कधी कधी तसे कोणीतर लागतेच. ते त्यांच्या घरातील आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सगळा इतिहास आहे. ते त्यांचे पुतणे आहेत. त्यावेळी त्यांचे सर्वात जवळचे व्यक्ती अजित पवारच होते. आता वितुष्ठ निर्माण झाले आहे. प्रत्येक गोष्टी अजित पवारांना विचारून केली, म्हणून त्यांना सगळे माहिती आहे.”
काय म्हणाले होते शरद पवार?
आरक्षणाच्या प्रश्नात केंद्र सरकार व संसदेची भूमिका महत्त्वाची आहे, राज्यघटनेत दुरुस्ती केल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नाही, यासाठी केंद्र सरकारची भूमिका महत्वाची आहे. दोन्ही समाजात कटुता वाढणार नाही, यासाठी धोरणात्मक भूमिका घेऊन जनमत तयार करावे लागणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार शरद पवार शनिवारी नगरमध्ये बोलताना व्यक्त केले. ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण नको असे काहीजण सांगतात. परंतु तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण दिले गेले आहे. याबाबत केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागणार आहे. वेळप्रसंगी राज्यघटनेत दुरुस्ती करून प्रश्न सोडवावा लागणार आहे, असे विधान शरद पवार यांनी केले होते.