लहान भाऊ कोण? मोठा भाऊ कोण? हे प्रश्न निर्माण करण्यापेक्षा नातं टिकलं हे महत्त्वाचं आहे असं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या भाजपा आणि शिवसेना यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. इतके दिवस आम्हीच मोठा भाऊ, आमचा पक्षच पितृपक्ष असं म्हणणारे उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत मवाळ झालेले दिसले. त्यांचं हे वाक्यच खूप काही सांगून जाणारं आहे.

शिवसेना 124, भाजपा 150 आणि मित्रपक्ष 14  असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे आमचं सगळं काही समसमान होईल असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. आज शिवसेना आणि भाजपाची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे,  भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची उपस्थिती होती.

यावेळी ज्यांना तिकिटं देण्यात आली नाहीत त्यांच्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं. तिकिटं कापली असं कोणाबद्दलही म्हणू नका कारण आम्ही जबाबदारी बदलली असं मी याबद्दल म्हणेन असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तसंच आदित्य ठाकरे हे वरळीतून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.