जिल्ह्यात चारही मतदारसंघांत भाजपला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतरही भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. दोन जागांसह राष्ट्रवादी जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. उमरग्यात शिवसेना व तुळजापूरमध्ये काँग्रेसने जागा राखल्या. राणा जगजितसिंह पाटील पहिल्यांदा, ज्ञानराज चौगुले दुसऱ्यांदा, राहुल मोटे तिसऱ्यांदा, तर पालकमंत्री मधुकर चव्हाण यांना सलग चौथ्यांदा संधी मिळाली.
चारही मतदारसंघांत चौरंगी लढती झाल्या. मतदारांनी भाजपला स्पष्ट नाकारताना राष्ट्रवादीवर सर्वाधिक विश्वास दाखवला. मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्या आमदारकीवर उस्मानाबादकरांनी चांगल्या मताधिक्याने शिक्कामोर्तब केले. मागील निवडणुकीत शिवसेनेचे ओम राजेिनबाळकर यांच्याकडून १६ हजार मतांनी पराभूत झालेले पाटील यंदा १० हजार ८०६ मतांची आघाडी घेऊन पहिल्यांदा निवडून आले. दूधगावकर यांची उमेदवारी शिवसेनेच्या पराभवाची नांदी ठरली. राजेिनबाळकर यांनी ७७ हजार ६६३, तर काँग्रेसमधून भाजपत आलेले दूधगावकर यांनी २६ हजार ८१ मते घेतली.
मोटे यांनी एकवटलेल्या विरोधकांना धूळ चारत १२ हजार ३८९ मतांची आघाडी घेत सलग तिसरा विजय मिळवला. राज्यात इतरत्र दिग्गज मंत्र्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. अशा प्रतिकूल स्थितीत परिवहनमंत्री मधुकर चव्हाण यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. नरेंद्र मोदी, शरद पवार या दिग्गज नेत्यांनी तुळजापुरात सभा घेऊन चव्हाण यांना लक्ष्य केले होते. या सर्वाना चोख प्रत्युत्तर देत तब्बल ३० हजार २०८ मतांची आघाडी घेऊन चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार तथा अजित पवार यांचे साडू जीवन गोरे, भाजपचे संजय िनबाळकर, शिवसेनेचे सुधीर पाटील व अपक्ष देवानंद रोचकरी यांना धूळ चारली.
अनुसूचित जातीसाठी राखीव उमरगा मतदारसंघात शिवसेनेने प्राबल्य कायम राखले. प्रामाणिक, सामान्यांना सहज उपलब्ध असलेला नेता अशी ओळख असलेल्या ज्ञानराज चौगुले यांना यंदा फार प्रयत्न करावे लागले नाहीत. पाच वष्रे लोकांच्या संपर्कात असल्यामुळे मतदारांनी त्यांना पुन्हा संधी दिली. युती तुटल्यामुळे काँग्रेसला या मतदारसंघात फायदा होईल, असे चित्र काँग्रेसकडून रंगविले जात असताना चौगुले यांच्या विजयामुळे त्याला तडा गेला. विरोधातील काँग्रेसचे किसन कांबळे, भाजपचे कैलास िशदे व राष्ट्रवादीने आयात केलेले डॉ. संजय गायकवाड यांना धूळ चारत २० हजार ४४२ मतांची आघाडी घेत चौगुले यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.
उस्मानाबाद वगळता भूम-परंडा राष्ट्रवादी, तुळजापूर काँग्रेसकडे, तर उमरगा शिवसेनेकडे ही मागील वेळची स्थिती कायम राहिली. उस्मानाबाद-कळंब मतदारसंघातील शिवसेनेची जागा कमी होऊन राष्ट्रवादीने झेप घेतली. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची एक जागा कमी होऊन राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या.
जालन्यात अर्जुन खोतकर विजयी
जिल्हय़ांतील ५पैकी ३ जागांवर भाजपने, तर प्रत्येकी एका जागेवर शिवसेना व राष्ट्रवादीने विजय मिळवला. भाजपचे बबन लोणीकर (परतूर), संतोष दानवे (भोकरदन) व नारायण कुचे (बदनापूर) विजयी झाले. जालना मतदारसंघातून शिवसेनेचे अर्जुन खोतकर व घनसावंगीतून राष्ट्रवादीचे राजेश टोपे निवडून आले. टोपे वगळता जिल्हय़ातील अन्य ४ आमदार पराभूत झाले.
जालना मतदारसंघात पहिल्या फेरीपासूनच चारही प्रमुख उमेदवारांमध्ये रस्सीखेच होती. अंतिम फेरीअखेर खोतकर यांनी काँग्रेसचे कैलास गोरंटय़ाल यांचा २९६ मतांनी पराभव केला. खोतकर यांना ४५ हजार ७८, तर गोरंटय़ाल यांना ४४ हजार ७८२ मते मिळाली. अरविंद चव्हाण (भाजप) यांना ३७ हजार ५९१ व अब्दुल रशीद (बीएसपी) ३६ हजार ३५० मते मिळाली. भोकरदन मतदारसंघात संतोष दानवे (भाजप) ६९ हजार ५९७ मते मिळवून विजयी झाले. राष्ट्रवादीचे चंद्रकांत दानवे यांना ६२ हजार ८४७ मते पडली. शिवसेना उमेदवार रमेश गव्हाड (३६ हजार २७८ मते) तिसऱ्या क्रमांकावर राहिले. संतोष हे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र आहेत.
घनसावंगी मतदारसंघाकडे जिल्हय़ाचे लक्ष लागले होते. राष्ट्रवादीचे राजेश टोपे ४३ हजार ४७६ मतांनी विजयी झाले. भाजपचे विलास खरात व शिवसेनेचे हिकमत उढाण यांचा त्यांनी पराभव केला. परतूर मतदारसंघात भाजपचे बबनराव लोणीकर विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश जेथलिया यांचा ४ हजार ३६० मतांनी पराभव केला. बदनापूर मतदारसंघातून भाजपचे नारायण कुचे २३ हजार ४९५ मताधिक्याने विजयी झाले. बबलू चौधरी (राष्ट्रवादी) दुसऱ्या, तर संतोष सांबरे (शिवसेना) तिसऱ्यावर क्रमांकावर राहिले.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2014 रोजी प्रकाशित
उस्मानाबाद, भूम-परंडय़ात राष्ट्रवादी; तुळजापूर काँग्रेस, उमरग्यात शिवसेना
जिल्ह्यात चारही मतदारसंघांत भाजपला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतरही भाजप तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. दोन जागांसह राष्ट्रवादी जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष ठरला.

First published on: 20-10-2014 at 01:55 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Third space of bjp in osmanabad