राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वर्षभरातील महत्वाच्या उत्सवांपैकी एक असणाऱ्या विजयदशमीच्या उत्सवासाठी बोलावले जाणारे प्रमुख पाहुणे देखील महत्वाची व्यक्ती असते. मागीलवर्षी या उत्सवासाठी संघाकडून बालकांच्या हक्कांसाठी कार्य करणारे व नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना बोलावण्यात आले होते. यंदा देखील संघाने अशाच प्रकारे एका महत्वपूर्ण व्यक्तीला उत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले आहे.
एचसीएलचे संस्थापक, चेअरमन आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त शिव नाडर हे यंदा ८ ऑक्टोबर रोजी संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर आयोजित विजयादशमी उत्सवाचे प्रमुख पाहुणे असणार आहेत. संघाच्या पदाधिकाऱ्याकडून ही माहिती देण्यात आली आहे.
भाजपा सरकार केंद्रात आणि राज्यात सत्तेत आल्यापासून संघाच्या प्रत्येक कृतीवर संपूर्ण देशाचे विशेषता देशभरातील राजकीय पक्षांचे व नेते मंडळींचे बारकाईने लक्ष असते. संघाच्या प्रत्येक कृतीमागे कुठला तरी खास हेतू असतोच, असे सर्वांना ठाऊक आहे. विजयादशमीच्या उत्सवाच्या दिवशी सरसंघचालक स्वयंसेवकांसह संघ परिवार व त्याच्याशी जुडलेल्या संघटनांना मार्गदर्शन करत असतात, याला विशेष महत्व असते. असे म्हटले जाते की, सरसंघचालक या भाषणाद्वारे संघाची दिशा ठरवत असतात. ज्यावर संघाशी निगडीत असलेल्या सर्व संघटना कार्य करतात.
या अगोदर माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना नागपूर येथे पार पडलेल्या संघाच्या तृतीय वर्ग प्रशिक्षणाच्या समारोपाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संघाकडून बोलवण्यात आले होते. त्यावेळी राजकीय वर्तुळात जोरदार उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. प्रणवदा यांनी या संघाच्या कार्यक्रमास जाऊ नये असा देखील अनेकांकडून त्यांना आग्रह करण्यात आला होता. मात्र तरीदेखील प्रणव मुखर्जी यांनी संघाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी त्यांनी स्वयंसेवकांचे बौद्धिक घेतले होते.
डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजयादशमीच्या मुहूर्तावर १९२५ मध्ये केली होती. तेव्हापासून विजयादशमीचा उत्सव हा संघाचा स्थापना दिन म्हणूनही साजरा करण्यात येतो. शिव नाडर यांची संघाच्या व्यासपीठावरील उपस्थिती लक्षणीय मानल्या जात आहे.