जालना : जिल्ह्यातील अंबड तालुक्यात लाच स्वीकारताना तिघांना पकडल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना शनिवारी सायंकाळी समोर आल्या. यामध्ये ग्रामविकास अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक व एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा समावेश आहे. या संदर्भातील दोन्ही गुन्ह्यांची नोंद अंबड पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे.

मोकळ्या जागेची नोंद करून प्रमाणपत्र देण्यासाठी पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून कुक्कडगाव येथील ग्रामविकास अधिकारी विष्णू भानुसे याच्याविरुध्द अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने सापळा रचून पंधरा हजार रुपये स्वीकारताना आरोपीस त्याच्या राहत्या घरी पकडले. आईच्या नावावर असलेल्या मोकळ्या जागेची नोंद करून प्रमाणपत्र देण्यासाठी लाच मागितल्याची लेखी तक्रार तक्रारदाराने केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अन्य एका प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील पथकाने अंबड पंचायत समितीमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सचिन कांबळे आणि कंत्राटी कर्मचारी रामदास मंडाळ याच्याविरुद्ध कारवाई केली. पंतप्रधान आवास योजनेचा दुसरा हप्ता खात्यावर जमा करण्यासाठी १७ जणांना प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे एकूण ८५ हजार रुपये मागितल्याची तक्रार यासंदर्भात करण्यात आली होती. तडजोडीअंती ६५ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य करून ते स्वीकारताना कांबळे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. दोन्ही आरोपींविरुद्ध अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.