रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात खडपोली पिंपळी खुर्द सोनारवाडी येथे मासेमारी करायला गेलेले तिघे नदीपात्रात अडकल्याने एकच खळबळ उडाली. रविवारी रात्री उशिरा प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखालील रेस्क्यू टीमने चार तासांच्या थरारक बचावकार्यानंतर सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळविले.
मिळालेल्या माहितिनुसार, संतोष वसंत पवार (वय ४०) रा. दळवटणे, त्यांची पत्नी सुरेखा संतोष पवार (वय ३५) आणि पुतण्या ओंकार रवी पवार (वय १७) रा. दळवटणे, राजवाडा हे सर्वजण मासेमारीसाठी नदीपात्रात गेले होते. नदीपात्रात अचानक पाणी वाढल्याने एका बेटावर हे सर्वजण अडकले.
या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी तातडीने कोळकेवाडी येथील टप्पा एक व दोनचे पाणी सोडणे थांबवण्याचे आदेश दिले, ज्यामुळे नदीतील पाण्याची पातळी कमी होण्यास मदत झाल्यावर चिपळूण नगरपालिका आणि अग्निशमन दलाची रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
रेस्क्यू टीमने दोरीच्या साहाय्याने बेटापर्यंत पोहोचून नागरिकांना सुरक्षित राहण्याचा धीर दिला. चिपळूण पोलीस, महसूल, अग्निशमन दल आणि नगरपरिषद यंत्रणा आदी सर्व विभाग घटनास्थळी उपस्थित होते.