भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मंगळवारी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या सभेला तीन एक हजारजण जमलेले. भरदुपारी टळटळीत ऊन्हात ‘ते’ आले. व्यासपीठावर विराजमान झाले. भाषणाला उभे राहिले. मात्र, अवघ्या तीन मिनिटांत उमेदवाराला निवडून देण्याचे आवाहन करीत निघून गेले. आयत्या वेळी उमेदवारी मिळालेल्या एकनाथ जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी या दरम्यान फटाके वाजवले. हार-तुऱ्यांनी स्वागत केले. काहीजण जागा शोधून बसण्याआधीच ‘सारे’ संपल्याने लांबून आलेल्या कार्यकर्त्यांचा हिरमोडच झाला.
येथे शिवसेनेचे आमदार आर. एम. वाणी व राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांच्यात लढत होईल, असे मानले जाते. भाजपच्या सभेला आलेला कार्यकर्ता म्हणाला, ‘गावात गाडी आली होती. सभेला चला म्हणाले. गावात काही काम नव्हते, म्हणून आलो. सभा सुरू केव्हा झाली आणि कधी संपली हेच कळले नाही.’ तसा सभेचा थाट होता. आंबेडकर चौकाजवळ बाजारपेठेत व्यासपीठ उभारलेले. मध्यभागी विवाहात नवरदेवाला देतात ती लाल खुर्ची. बाजूला तिघांची तसबीर. मध्यभागी छत्रपती शिवाजीमहाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व बाजूला गोपीनाथ मुंडे.
गडकरींचे स्वागत झाले. उमेदवार जाधव यांनी तीन मोठे हार आणलेले. दोन मोठे हार त्यांच्यासाठी, तर एक प्रतिमेसाठी. व्यासपीठावर पंखा होता. कार्यकर्ता त्याच्यासमोर येई आणि गडकरी त्याला हवा येऊ दे, असे सांगत तेव्हा उमेदवार जाधव वैजापूरची समस्या मांडत होते. रामकृष्ण उपसासिंचन योजनेची समस्या सांगून झाली. काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यावर टीका केल्यावर गडकरी भाषणाला उभे राहिले. नागपूर येथे पंतप्रधान मोदी यांची ४ वाजता सभा आहे. तेथे जाणे आवश्यक आहे. भाजप उमेदवार जाधव यांनी सांगितलेल्या सर्व समस्या सत्ता आल्यावर सोडवू, त्यांना निवडून द्या, असे सांगून गडकरींनी भाषण संपविले. पांगलेली गर्दी गोळा होण्यापूर्वीच गडकरीचे भाषण संपलेही होते. तीन हजारांच्या गर्दीसाठी तीन मिनिटांचे भाषण, अशीच कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया सभेनंतर कार्यकर्त्यांत होती.