यवतमाळ जिल्ह्याातील टिपेश्वर अभयारण्यातील ‘टी१-सी१’ हा वाघ अवघ्या पाच महिन्यात एक हजार ३०० किलोमीटरचे अंतर पार करुन बुलढाणा जिल्ह्याातील ज्ञानगंगा अभयारण्यात पोहोचला आहे. या वाघाला २७ मार्च २०१९ ला रेडिओ कॉलर लावण्यात आली होती. त्यानंतर जून २०१९ मध्ये त्याने टिपेश्वर अभयारण्य सोडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टी१-सी१ या वाघाला टी१ वाघिणीने जून २०१६ मध्ये टिपेश्वर अभयारण्यात जन्म दिला. या वाघिणीला सी२ आणि सी३ हे दोन नर बछडे आहेत. २०१९च्या सुरूवातीला हे तिन्ही बछडे वाघिणीपासून वेगळे झाले होते. देहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेचे डॉ. पराग निगम आणि डॉ. बिलाल हबीब यांच्या नेतृत्त्वात २५ मार्च २०१९ ला सी३ या वाघाला आणि २७ मार्च २०१९ ला सी३ या वाघाला रेडिओ कॉलर लावण्यात आली. आईपासून विभक्त झालेल्या आणि नवीन क्षेत्राच्या शोधात असलेल्या वाघाच्या एकूण वर्तणुकीचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने रेडिओ कॉलर लावण्यात आले. सी३ आणि सी१ या वाघाने पांढरकवडा विभागाच्या लगत असलेल्या आणि तेलंगणाच्या सीमेला लागून असलेले क्षेत्र त्यांच्या अधिवासासाठी निवडल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

जुलै २०१९ मध्ये सी३ हा वाघ तेलंगणाला स्थलांतरीत झाला आणि आदिलाबाद शहराच्या अगदी जवळ गेला. मात्र, त्याठिकाणी स्थायिक होण्याऐवजी तो दहा दिवसातच टिपेश्वरला परत आला आणि आता तो टिपेश्वर येथेच स्थायिक झाला आहे. पेंच व्याघ्र प्रकल्प, आदिलाबाद विभाग, नांदेड विभाग आणि वनविकास महामंडळ किनवट यांनी मे २०१९ मध्ये एकत्रीत सर्वेक्षणाला सुरुवात केली. या सर्वेक्षणानुसार जून २०१९ मध्ये हा वाघ कॉरिडॉरच्या बाजूने बाहेर गेल्याचे स्पष्ट झाले. ऑगस्ट आणि सप्टेंबरदरम्यन तो आदिलाबाद आणि नांदेड विभागातील आंतरराज्यीय जंगलात बराच काळ होता. त्यानंतर त्यांनी थोडा काळ तो पैनगंगा अभयारण्यातही गेला. ऑक्टोबरमध्ये सी१ हा वाघ तेथून बाहेर पडला आणि पूसद विभाग व नंतर ईसापूर अभयारण्यात गेला. ऑक्टोबर २०१९च्या अखेरीस तो मराठवाडा परिसरातील हिंगोली जिल्ह्याात दाखल झाला.

तीन वर्षाचा हा वाघ नोव्हेंबरच्या सुरुवातीला तो अकोला जिल्ह्यात आणि नोव्हेंबरच्या अखेरीस तो बुलढाणा जिल्ह्याात दाखल झाला. चिखली आणि खामगावजवळ आल्यानंतर एक डिसेंबरला या वाघाने ज्ञानगंगा अभयारण्यातील दुसऱ्या संरक्षित क्षेत्रात प्रवेश केला. मेळघाट लँडस्केपपासून हे क्षेत्र अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर आहे. वाघांच्या या स्थलांतरणामुळे त्याच्या वैज्ञानिक अभ्यासाची गरज निर्माण झाली आहे, असे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक डॉ. रवीकिरण गोवेकर यांनी सांगितले.

पण, मानवी संघर्ष नाही –

दोन राज्यातील, सहा जिल्ह्याांमधील शेकडो गावे, शेती ओलांडून या वाघाने १३०० किलोमीटरचा प्रवास केला. या भ्रमंतीत त्याने गुरेढोरे मारली, पण त्याचा मानवाशी संघर्ष झाला नाही. हिंगोली जिल्ह्याात सी१ या वाघाजवळ गावकरी पोहोचले होते, पण कोणतीही अनुचित घटना घडली नाही. २०१६ मध्ये टिपेश्वरमधील आणखी एक आईपासून वेगळा झालेला वाघ जानेवारी २०१९ मध्ये कावल व्याघ्र प्रकल्पात कॅमेरा ट्रॅपमध्ये आला होता. तसेच सी२ या वाघाने देखील बरेच अंतर व्यापले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger cross one thousand three hundred km distance in five month bmh
First published on: 02-12-2019 at 08:38 IST