महाराष्ट्राची आई तुळजाभवानी देवीचा नवरात्रातील दुसर्या माळेचा छबिना उत्सव अत्यंत उत्साही व भक्तीमय वातावरणात रविवारी रात्री दहा वाजता तुळजाभवानी मंदिरात पार पडला. रविवारी सायंकाळी सात वाजता देवीची अभिषेक करण्यात आली. अभिषेक पूर्ण झाल्यानंतर देवीची रात्रीची नित्योपचार पूजा पाळीचे पुजारी मुकुंद कदम आणि सहकारी यांनी केले. त्यानंतर महंत तुकोजीबुवा महाराज यांच्या उपस्थितीत चरणतीर्थ पूजा संपन्न झाली. दरम्यान रात्री 10 वाजता तुळजाभवानी देवीचा पारंपारिक छबिना काढण्यात आला.
आई राजा उदो-उदो, सदानंदीचा उदो-उदो जयघोषात मोजके आराधी गोंधळी आणि मानकरी, सेवेकरी व पुजार्यांनी छबिन्यावर पुष्पवृष्टी करून दर्शन घेतले. यावेळी छबिना वाहनावर चांदीच्या सिंहासनात तुळजाभवानी देवीच्या पादुका ठेवल्या जातात आणि प्रतिकात्मक तुळजाभवानी देवीची चांदीची मूर्ती ठेवली जाते. अश्व वाहनावरील या छबिन्याचा उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांविना पार पडला.