विधानसभा निवडणुकीचा प्रचाराने आता जोर पकडला आहे. बंधूभगिनीची लढत असलेल्या बीड जिल्ह्यातील वातावरणही प्रचाराने तापू लागले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे दोघांनीही एकमेकांविरूद्ध जोरदार प्रचार सुरू केला आहे. पंकजा मुंडे यांनी तर जोपर्यंत बीडमधील भाजपाच्या सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा निर्धार केला आहे.

पंकजा मुंडे यांची आष्टी मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार भीमराव धोंडे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा झाली. यावेळी पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. पंकजा म्हणाल्या,”धनंजय मुंडे म्हणतात की, त्यांच्या भीतीने परळीत पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा घेत आहे. अरे पंकजा मुंडे कोणाला भीत नाही, मोदी लोकसभेतील अभूतपूर्व यशानंतर शाबासकी देण्यासाठी म्हणून परळीत येत आहेत. पंतप्रधान आले तर बीड जिल्ह्याला कायमस्वरूपी दुष्काळ मुक्तीची घोषणा करू शकतील. भरघोस निधी मिळाला, तर कष्ट संपतील राष्ट्रवादीच्या पणवती लोकांना विकासाचे देणे घेणे नाही. ते तर भकास गावचे राजे आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “जोपर्यंत बीडमधील सर्व उमेदवारांना गुलाल लागणार नाही तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही,” असा निर्धार त्यांनी यावेळी केला. “माझ्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. हे काही नवीन नाही. स्व.गोपीनाथ मुंडे असताना देखील सगळ्यांचे लक्ष बीडकडे असायचे. राष्ट्रवादीची लोक खोटा प्रचार करतात की पंकजा मुंडेना भीती वाटते. मी महाराष्ट्रात प्रचार करुन माझा मतदारसंघ सांभाळते. मला महाराष्ट्राची चिंता आहे. बीड जिल्ह्यात एकही बंडखोरी नाही. पाच वर्षांत पालकमंत्री असताना बीड जिल्ह्यात कारभार नाही तर संसार केला,” असं पंकजा यांनी सांगितलं.

धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना पंकजा म्हणाल्या, “धनंजय मुंडे यांच्यासारखे कर्तृत्वान नेते राष्ट्रवादीत गेल्यामुळे राष्ट्रवादीचा भोपळा झाला. माझी निवडणूक काही अवघड नाही. विजय निश्चित आहे. राष्ट्रवादी हे बुडणार जहाज आहे. सगळ्यांचा अंत जवळ आल्याने ते त्या जहाजात आहेत. भाजपाच्या मोठ्या जहाजात तरण्यासाठी अनेकांनी उड्या मारल्या,” असे पंकजा म्हणाल्या.