महापालिकांच्या आवारातच उघडपणे गुटखा तोंडात घालणारे नगरसेवक, जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीपर्यंत तंबाखू मळणारे सदस्य यांनीच स्वच्छता अभियानाला गालबोट लावले असताना अशा लोकसेवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत शुक्रवारी स्वच्छता कशी करावी याचा धडा देणार आहेत. शिवाजी विद्यापीठात दुपारी होणाऱ्या या कार्यवाहिला पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथील महापौर, आयुक्त, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी उपस्थित राहणार आहेत.
केंद्र शासनाने स्वच्छ भारत अभियानाची संकल्पना मांडली आहे. त्याअंतर्गत देशभर हे अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनही राज्यात हे अभियान राबवित आहे. पहिल्यांदा मुंबईत व नंतर नागपुरात अभियान राबविण्यात आले. त्यानंतर आता कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कोल्हापूर महापालिकेवर संयोजनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोल्हापुरात कार्यशाळा घेण्यासाठी जागेचा शोध सुरू होता. त्यावेळी शासनाच्या नगरविकास विभागाचे अवर सचिव सुधाकर बोबडे नुकतेच येऊन गेले. त्यांना महापालिका अधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठाचा सिनेट हॉल दाखविला. प्रशस्त असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिनेट हॉलचीच कार्यशाळेसाठी निवड केली. महापालिका प्रशासनाला तसे कळविण्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकाऱ्यांची पाच जिल्ह्यांतील महापौर, आयुक्त, नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांच्या स्वागताच्या सरबराईसाठी तारांबळ उडाली आहे.