आमची शाळा खासगी विनाअनुदानित असल्याने ती शिक्षण उपसंचालकांच्या अखत्यारीत येत नाही. त्यामुळे उपसंचालक कार्यालय आमची फी ठरवू शकत नाही, असा दावा पत्रकाद्वारे करणाऱ्या येथील रासबिहारी शाळेला शिक्षण उपसंचालकांनी जाब विचारला आहे. शाळा असे विधान कसे करू शकते, याबाबत तत्काळ स्पष्टीकरण करण्याचे आदेश त्यांनी शाळेचे अध्यक्ष व मुख्याध्यापकांना दिले आहेत. दरम्यान मोर्चाच्या दरम्यान दिलेल्या निवेदनावर पुढील चर्चा करण्यासाठी मंच व पालकांचे शिष्टमंडळ उपसंचालकांना सोमवारी सायंकाळी पाच वाजता भेटणार आहे.
शाळेच्या फी वाढीविरोधात शिक्षण बाजारीकरण विरोधी मंचाच्या नेतृत्वाखाली पालकांनी आपल्या पाल्यांसह मागील आठवडय़ात मोर्चा काढला होता. उपसंचालकांनी शाळेला जाब विचारण्याच्या कारवाईचे मंच व पालक संघटनेने स्वागत केले आहे. शाळेने आपल्या पत्रकात पालकांनी २८ फेब्रुवारीपर्यंत फी न भरल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई केली जाईल, त्यांना परीक्षेस बसू दिले जाणार नाही, असा इशारा दिला होता. असा इशारा देणे बेकायदेशीर असल्याचे निवेदन पालक व मंच प्रतिनिधींनी उपसंचालकांना दिले होते. या मागण्यांना प्रतिसाद देत शिक्षण उपसंचालक मंडळाने हे पत्रक तत्काळ रद्द करावे तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक, आर्थिक गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आदेशही पत्रात दिले आहेत. शाळेच्या फी वाढीविरोधातील तक्रारीबाबत अंतिम निर्णय अजून झालेला नसला तरी पालकांनी शाळेच्या इशाऱ्यांना न घाबरता ठाम उभे राहावे, असे आवाहन पालकांनी केले आहे.
मोर्चाच्या दरम्यान दिलेल्या निवेदनावर पुढील चर्चा करण्यासाठी मंच व पालकांचे शिष्टमंडळ उपसंचालकांना सोमवारी सायंकाळी पाच वाजता भेटणार आहे. मोर्चामध्ये सामील झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा देत असलेल्या मानसिक व शैक्षणिक त्रासाबद्दल उपसंचालकांकडे तक्रारी सादर करण्यात येणार आहेत. रासबिहारी शाळेने आपली बाजू नियमांवर आधारित मांडावी व बेकायदेशीर फी वसुलीसाठी लहान मुलांना वेठीस धरू नये, असे आवाहन मंचातर्फे करण्यात आले आहे.