पुरंदर तालुक्यातील टोमॅटोचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेलसर येथील शेतकऱ्यांनी १०० एकराच्या आसपास टोमॅटोची लागवड केली आहे. दरवर्षी हीच लागवड १००० एकराच्या आसपास असते. परंतु, यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे आणि योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागण कमी केली. सध्या टोमॅटोला सोन्याचा भाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळाले.

१०० ते १५० रुपये किलोने टोमॅटो विकला गेला. अजूनही भाव चांगला मिळत आहे. विशेष म्हणजे जयपूर (राजस्थान) येथून आलेले व्यापारी शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन टोमॅटो जागेवरच खरेदी करून राजस्थानला पाठवित आहेत. याशिवाय पुणे, मुंबईलाही टोमॅटो रवाना होत आहेत. टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे.

हेही वाचा : पिक विमा योजनेला रायगडकरांचा प्रतिसाद, ६४ हजार २२९ शेतकऱ्यांची पिक विम्यासाठी नोंदणी

शेतातील टोमॅटो तोडून त्याची योग्य प्रतवारी करून कॅरेटमध्ये टोमॅटो भरण्याचे काम सुरू आहे. येथील शेतकऱ्यांनी आर्यमान व योगी जातीच्या टोमॅटोची लागवड केली आहे. पाण्याची कमतरता असल्याने ठिबक सिंचन व मल्चिंग पेपर पद्धतीचा वापर करून शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतल्याची माहिती उत्पादक शेतकरी देवानंद जगताप यांनी दिली.

“आम्ही वीस वर्षे टोमॅटो लागवड करीत आहोत. मात्र, गेली तीन वर्षे तोटाच झाला. परंतु. यंदा सर्वात जास्त भाव मिळाला आहे,” असं देवानंद जगताप यांनी सांगितलं.

बेलसरला टोमॅटो पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. परंतु, गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी पुरेसा पाऊस नसल्याने पाण्याची टंचाई जाणवत आहे. कऱ्हा नदीचे पात्र कोरडे पडले असून शेतातील विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे.

टोमॅटो पिकामुळे गेल्या तीन वर्षात अनेक शेतकरी कर्जबाजारी

जेजुरी पासून पाच किलोमीटर अंतरावर कऱ्हा नदीकाठी असलेल्या बेलसर येथील जमीन टोमॅटो पिकासाठी चांगली असल्याने येथील शेतकरी वर्षानुवर्षे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात. एक एकर टोमॅटो पीक घेण्यासाठी दीड लाखाच्या आसपास खर्च येतो. यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून, घरातील दाग-दागिने मोडून टोमॅटो लागवड केली होती. पण, गेल्या तीन वर्षात अत्यंत कमी भाव मिळाल्याने शेतकरी अडचणीत आले, कर्जबाजारी झाले. यावेळी अनेक जणांनी पाणी कमी असल्याने व तोटा होण्याच्या भीतीने लागवड केली नाही.