तूर खरेदीस मुदतवाढ मिळाली असूनही बारदाना व ग्रेडरअभावी या खरेदीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उमटल्याचे आज दिसून आले.

गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेला तूर खरेदीचा गोंधळ अद्याप संपुष्टात न आल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाल्याची स्थिती आहे. तूर उत्पादनाचा अंदाज न आल्याने शासनास वारंवार खरेदी मुदत वाढवावी लागली, पण मुदतवाढ देऊनही विविध कारणांनी रखडलेली खरेदी शेतकऱ्यांना समाधान देऊ शकली नव्हती.

आता परत ३१ मे पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने आजपासून सर्व केंद्रांवर खरेदी सुरू होणे अपेक्षित होते, पण पहिल्याच दिवशी बोजवारा उडाला. देवळी, पुलगाव, कारंजा व समुद्रपूर केंद्रे सुरू झाली तर आर्वी, वर्धा व हिंगणघाट ही सर्वात मोठी तीन खरेदी केंद्रे बंदच होती. नाफे डकडे असणारा मनुष्यबळाचा तुटवडा हे मुख्य कारण आहे. नाफे डने महाफे डवर खरेदीची जबाबदारी टाकली आहे, पण तुरीचा दर्जा तपासण्याचे काम करणारे ग्रेडर पुरेशा प्रमाणात नाही.

त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू झाला. दुसरी बाब बारदाण्याच्या टंचाईची आहे. एका ट्रकमधे ५० गाठी येतात. एका गाठीत बारदाण्याचे पाचशे नग असतात. हजार बारदाण्यांची गरज असल्याची नोंदणी करण्यात आली, पण बारदाणा वेळेवर न पोहोचल्याने खरेदी खोळंबली.

महाफे डचे जिल्हा व्यवस्थापक बिसने हे म्हणाले, ग्रेडर व बारदाण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे मागणी केली आहे. उपलब्ध झाल्यावर सर्व केंद्रे सुरू होतील. मात्र, काही केंद्रांवर खरेदी सुरू असून ५० ते ६० हजार क्विंटल तूर खरेदी होण्याची शक्यता आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अशा अडचणीमुळे नमनालाच खोळंबा झाला. विविध केंद्रांवर खरेदीची अंदाजित आकडेवारी तयार आहे. हिंगणघाट ३० हजार क्विंटल, वर्धा १२ हजार, आर्वी १३ हजार, देवळी ९ हजार, पुलगाव ११ हजार, सेलू ६ हजार, समुद्रपूर १ हजार व कारंजा ३ हजार क्विंटल तूर खरेदी अपेक्षित आहे. वर्धा बाजार समितीकडे नोंदणीकृत शेतकऱ्यांची खरेदी नाही. नोंदणी न झालेल्या १२ हजार क्विंटलपैकी आठ हजार क्विंटलची खरेदी आटोपली. आतापर्यंत जिल्ह्य़ात १ लाख ७० हजार क्विंटल तूर खरेदी झाली आहे. ही आजवरची सर्वात मोठी खरेदी ठरली आहे. जिल्ह्य़ात नाफे ड व अन्न महामंडळातर्फे ही खरेदी झाली. महामंडळाने खरेदीची जबाबदारी विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग सोसायटीवर टाकली, पण मधल्या काळात मुदत संपल्याने ही केंद्रे बंद करण्यात आली.

अन्न महामंडळाने सुरुवातीला खरेदीबाबत निरुत्साहच दाखविल्याने अपेक्षेप्रमाणे खरेदी झालेली नव्हती. बारदाण्याची टंचाई सांगत खरेदी बंद केल्याने मग सिंदी-सेलू भागातील शेतकऱ्यांची तूर महाफे डला खरेदी करावी लागली. तूर खरेदीचा हा गोंधळ वारंवार सुरू राहिल्याने या काळात व्यापाऱ्यांची चांदी झाली. कारण मुदतवाढ मिळूनही खरेदी केंद्रे ठप्प राहिल्याने केंद्रावर आलेल्या तुरीवर व्यापाऱ्यांनी डोळा ठेवला. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमीदरात तूर विकून टाकावी लागली. आजपासून खरेदी पूर्ववत होण्याच्या घोषणेने शेतकऱ्यांचा जीव भांडय़ात पडला होता, पण आता ग्रेडरचा अभाव खरेदीला विलंब लावणारा ठरत आहे.