विदर्भात सध्या मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला आहे. येथील नक्षलग्रस्त आणि दुर्गम तालुका म्हणून गणल्या जाणाऱ्या भामरागड तालुक्याचा तर जगाशीच संपर्क तुटला आहे. तालुक्यात प्रवेशासाठी असलेला एकमेव पुलाचा रस्ताच पाण्याखाली गेल्याने आणि तीन दिवसांपासून येथे वीज नसल्याने संपर्काचे माध्यम असलेले मोबाईलही बंद पडले आहेत.

लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण भागातील पाचही तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असून यांपैकी चार तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. यातील भामरागड तालुक्याच्या मुख्यालयात प्रवेशासाठी असलेला एकमेव मार्ग हा पार्लकोटा नदीवरील पूल हा आहे. मात्र, यंदाच्या मुसळधार पावसामुळे या नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून त्यामुळे सुमारे १०५ गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे.

मुसळधार पावसामुळे भामरागडच्या लगत असलेल्या छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागडमधील इंद्रावती, पामूल, गौतम आणि पर्लकोटा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तसेच गेल्या तीन दिवसांपासून येथील वीज पुरवठाही पावसामुळे खंडीत झाला असून त्यामुळे इथल्या नागरिकांचे मोबाईल संचही बंद पडले आहेत. एकूणच सर्व प्रकारचे संपर्काची माध्यमं ठप्प झाल्याने प्रशासनालाही पूर स्थितीचा आढावा घेताना अडचणी येत आहेत.

भामरागडप्रमाणे, एटापल्ली, सिरोंचा तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. मुलचेरा तालुक्यातील दिना नदीलाही रविवारी मध्यरात्री पूर आला होता. दरम्यान, पाऊस काहीसा ओसरल्याने सध्यातरी मुलचेरा मार्ग सुरू असून पुन्हा पावसाचा जोर वाढल्यास हा मार्गही बंद होऊ शकतो. ठिकठिकाणी मुख्य रस्त्यांवर मोठी झाडेही कोसळल्याने मार्ग बंद झाले आहेत.